लॉटरी लागल्याचा ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:12 AM2021-08-17T04:12:53+5:302021-08-17T04:12:53+5:30

नागपूर : लॉटरी लागली आहे किंवा महागड्या बक्षिसाठी तुम्हाला ई-मेल, मेसेज आल्यास सावधान. लालूच दाखविणारे हे मेसेज १०० टक्के ...

Beware of e-mails or messages about winning the lottery! | लॉटरी लागल्याचा ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान !

लॉटरी लागल्याचा ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान !

Next

नागपूर : लॉटरी लागली आहे किंवा महागड्या बक्षिसाठी तुम्हाला ई-मेल, मेसेज आल्यास सावधान. लालूच दाखविणारे हे मेसेज १०० टक्के फसवणुकीचे असते. या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अशा मेसेजवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा, असा सावधानतेचा इशारा सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

फिशिंग ई-मेलच्या माध्यमातून फसवणूक

-यात सायबर गुन्हेगार एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या नावाने असलेल्या ई-मेल आयडीसारखा वाटणारा डुप्लिकेट ई-मेल तयार करतो. त्यानंतर ओळखीच्या व्यक्तीचा ई-मेल असल्याची संबंधित व्यक्तीची खात्री होते. त्या मोठ्या व्यक्तीला सायबर गुन्हेगार माहिती विचारतो आणि त्याचा दुरुपयोग करतो. नागपुरातील अग्रवाल नावाचे एक मोठे तांदूळ व्यापारी रशियाच्या कंपनीला तांदळाचा पुरवठा करतात. त्यांच्या नावासारखाच फक्त एका शब्दाचा फरक असलेला हुबेहूब ई मेल सायबर गुन्हेगाराने तयार केला. त्यानंतर रशियन कंपनीला बनावट बिल पाठविले. तुमचा तांदूळ जहाजाने रशियाला पोहोचल्याचे सांगितले आणि इंग्लंडमध्ये अग्रवाल यांच्या कंपनीच्या नावाने खाते उघडून त्यात तांदळाची ३.५० कोटी रुपये रक्कम टाकायला लावली. अशा प्रकारे फिशिंग ई-मेलच्या माध्यमातून सायबर गुन्हेगाराने फसवणूक केली.

कंपनीच्या नावाने ई-मेल, मेसेज पाठवून लूट

-अनेकदा एखाद्या कंपनीच्या नावाने सायबर गुन्हेगार ई-मेल किंवा मेसेज करतात. नागरिकांनी त्यांच्या ई-मेल, मेसेजला प्रतिसाद दिल्यानंतर ते संबंधित नागरिकाचा पासवर्ड, पिन चोरी करून त्याच्या खात्यातील रक्कम उडवित असल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ही घ्या काळजी

-पब्लिक वायफाय वापरू नये. वापरल्यास तुमचे बँक, सोशल मीडियाचे सगळे पासवर्ड सायबर गुन्हेगाराकडे जातात. मोबाईलमध्ये घातक व्हायरस घुसून आपल्या मोबाईलमधील सर्व माहिती सायबर गुन्हेगाराला मिळते. या माध्यमातून ते गुगल पेचा वापरही करू शकतात. त्यामुळे पब्लिक वायफाय वापरू नये. याशिवाय फोनची ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट ठेवल्यास नवा घातक व्हायरस आल्यास मोबाईलचे नुकसान होऊन मोबाईलमधील माहिती सायबर गुन्हेगाराला मिळत नाही. त्यासाठी फोनची ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट ठेवणे आवश्यक आहे. तसेच सतत पासवर्ड बदलत राहिल्यास तुमचे सोशल मीडिया, बँकेचे खाते सुरक्षित राहते.

वेबसाईटची सुरुवात एचटीटीपीपासून झाली आहे का?

-एचटीटीपीने सुरुवात झालेली वेबसाईट सुरक्षित असते. इतर वेबसाईट असुरक्षित असतात. त्यामुळे एचटीटीपीपासून सुरुवात झालेल्या वेबसाईटवरच विश्वास ठेवावा. इतर वेबसाईटवरून आलेल्या मेसेजला प्रतिसाद दिल्यास तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता राहते.

लाॅटरी लागली म्हणून उकळले पैसे

केस १

-कळमना येथील कौशाली ठक्कर (२७) यांना एक मेसेज आला. त्यात एक लिंक पाठविण्यात आली होती. तुम्ही आयफोन जिंकला असल्याचे त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यासाठी तुम्हाला जीएसटी भरावा लागेल असे सायबर गुन्हेगाराने सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेने लिंकवर प्रतिसाद दिला असता तिच्या खात्यातून ४१,७४१ रुपये सायबर गुन्हेगाराने उडविले.

केस २

-इशरत जहा (३५) या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या महिलेला २५ लाखाची लॉटरी लागली असा मेसेज मोबाईलवर आला. परंतु त्यासाठी फी भरावी लागेल, असे सायबर गुन्हेगाराने सांगितले. त्याने या महिलेस ३४,३०० रुपये ऑनलाईन भरायला लावले. पैसे भरल्यानंतर सायबर गुन्हेगाराने मोबाईल बंद करून टाकला. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर या महिलेने सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

............

Web Title: Beware of e-mails or messages about winning the lottery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.