सावधान! वीजबिलाबाबतचा एक मेसेज करू शकतो घात

By आनंद डेकाटे | Published: May 21, 2024 04:08 PM2024-05-21T16:08:08+5:302024-05-21T16:09:20+5:30

सायबर चोर सक्रीय, बनावट मेसेजचा सुळसुळाट : सतर्क राहण्याचे आवाहन

Beware! Fraud messages are spreading through the electricity bill | सावधान! वीजबिलाबाबतचा एक मेसेज करू शकतो घात

Beware! Fraud messages are spreading through the electricity bill

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
गेल्या महिन्याचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. यात वीज बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे. या संदेशांना ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाल्यास मोबाइल किवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा बनावट मेसेजकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टमद्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येते. तसेच अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइलवर संपर्क करण्याबाबत कळवत नाही. वीज बिलाबाबत काही शंका व तक्रारी असल्यास किंवा याबाबत काही एसएमएस आल्यास वीजग्राहकांनी २४ तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा. असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

अनोळखी क्रमांकावरून वीजबिल भरण्यासंदर्भातील येणाऱ्या फ़सव्या संदेशाला बळी पडू नये आणि वीज ग्राहकांना लुटणाऱ्या सायबर स्कॅमरपासून सावध राहण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. महावितरणने कंपनीच्या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या अॅपवर फेक मेसेजद्वारे होणारी फसवणूक कशी रोखता येईल याची विस्तृत माहिती देखील दिली असल्याचे महावितरणने कळविले आहे.
 

तर येथे करा तक्रार

आपली फसवणूक झालीच तर ग्राहक जवळच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार,एफआयआर नोंदवू शकतो किंवा राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल https://cybercrime.gov.in वर किंवा १९३० या क्रमांकावरील नागरिक आर्थिक फ़सवणूक पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतो.
अधिक माहिती ग्राहक १९१२/१९१२०/१८००-२१२-३४३५/१८००-२३३3 या अधिकृत टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकतात.

Web Title: Beware! Fraud messages are spreading through the electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.