सावधान ! फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक; दरवर्षी पाच हजारांवर लोकांची जाते दृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 06:06 PM2024-10-29T18:06:44+5:302024-10-29T18:10:30+5:30
Nagpur : दुखापतींमध्ये १६ वर्षांखालील ४९ टक्क्यांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी म्हणजे अमावस्येच्या काळोखाला भेदणारा प्रकाशाचा सण. रोशणाईचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. पण कधी कधी अति उत्साहात सुरक्षेकडे जरा दुर्लक्ष होते. विशेषतः फटाक्यांमुळे अंधत्वाची जोखीम निर्माण होते. देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते. अनार, सुतळी बॉम्ब, चक्री आणि रॉकेट या फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका अधिक वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
फटाक्यांमुळे होणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण जागतिक पातळीवर पाच लाखांवर आहे. फटाक्यात चारकोल, गंधक, नायट्रेट, क्लोरेट, परफ्लोरेट आदी घटक असतात. या घटकाचा निर्जीव आणि जीवित दोघांवरही दुष्परिणाम होतो. फटाका फुटल्यानंतर निघणारा धूर डोळ्यांना व फुफ्फुसांना, तसेच त्वचेला अपायकारक असतो. दमा व अॅलर्जीचे प्रमाण वाढते. फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण, वायुप्रदूषण व सामाजिक प्रदूषण होते. फटाके फोडलेल्या ठिकाणाचे तापमान ४०० ते ५०० डिग्रीपर्यंत वाढते. यामुळे फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते
फटाक्यांच्या धोक्यापासून १६ वर्षांखालील मुलांना जपा
बंगरुळू येथील शासकीय मिंटो ऑप्थल्मोलॉजी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नोंदीनुसार, २००८ ते २०२० या कालावधीत फटाक्यांमुळे डोळ्यांना झालेल्या दुखापतींवरील आणि रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती सादर केली आहे. यात फटाक्यांमुळे झालेल्या डोळ्यांच्या दुखापतींपैकी १६ वर्षांखालील मुलांचा वाटा ४९.३ टक्के आहे. यामुळे फटाक्यांपासून १६ वर्षांखालील मुलांना जपा, असे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञांनी केले आहे.
बघणाऱ्यांना जास्त इजा
सारक्षी नेत्रालयाच्या नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. रिकल फुसाटे, नेत्ररोग तज्ज्ञ फटाके फोडणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांना याची जास्त इजा होते. कारण, स्फोटामुळे दगड, माती वेगाने उडते व डोळ्याला व इतर अवयवांना इजा होऊ शकते. फटाक्यात जळती ठिणगी किंवा घटक गेल्यास डोळा कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. दृष्टिहीनता, अंधत्व व गंभीर दुखापतींमुळे डोळा गमवावा लागू शकतो. बारूदमुळे डोळ्यांना रासायनिक इजा होऊ शकते.
जखम झाल्यास नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या
"फटाक्यामुळे डोळ्याला इजा झाल्यास तातडीने नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. डॉक्टरांपर्यंत पोहचेपर्यंत डोळे चोळू नका. यामुळे डोळ्यातील द्रव्य बाहेर येऊ शकते किंवा डोळ्यात फसलेले कण आत खोलवर जाऊ शकतात. डोळा खराब होण्याची शक्यता असते. स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत. शक्य तितक्या लवकर जवळच्या नेत्ररोग तज्ज्ञांना दाखवून उपचार करावा."
- डॉ. प्रशांत बावनकुळे, नेत्ररोग तज्ज्ञ.