राजकीय शिफारस केली तर खबरदार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:10 AM2021-02-27T04:10:31+5:302021-02-27T04:10:31+5:30
राजीव सिंह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बदली, आवडते पद मिळविण्यासाठी अनेकदा मनपाचे कर्मचारी व अधिकारी राजकीय संबंधांचा फायदा ...
राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बदली, आवडते पद मिळविण्यासाठी अनेकदा मनपाचे कर्मचारी व अधिकारी राजकीय संबंधांचा फायदा उचलताना दिसून येतात. पदाधिकाऱ्यांसोबतच आमदार व खासदारांचे पत्र आणून वरिष्ठांवर दबाव बनवतात. मात्र आता यापुढे अशी शिफारस करण्याची सवय मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाग पडणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी परिपत्रक जारी करून अशा लोकांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
आयुक्तांसोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे येणे सुरू झाले. ‘कोरोना’ कालावधीत अनेक अधिकारी स्वत:ला ‘फिल्ड’वरून हटवून आरामाच्या ठिकाणी काम मिळावे यासाठी शिफारसपत्र आणत होते. यामुळे यंत्रणेत कामाला अडथळे येण्यास सुरुवात झाली. आयुक्तांपर्यंत ही बाब पोहोचली. घनकचरा व्यवस्थापन विभागात स्वत:ला अधिकारीपद मिळावे यासाठी एका अधिकाऱ्याने नेता व मंत्र्यांकरवी आयुक्तांना फोन करविले. त्यामुळे त्रस्त झालेल्या आयुक्तांनी संबंधित परिपत्रक जारी केले.
जो कर्मचारी व अधिकारी शिफारस घेऊन विभागप्रमुख किंवा सहायक आयुक्तांकडे जाईल त्यांची स्वाक्षरी घेऊन फाईल तयार करण्यात यावी. संबंधितांवर कडक कारवाई होईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
असे आहेत नियम
महाराष्ट्र नागरी सेवा (व्यवहार) नियम १९७९ च्या कलम २३ अंतर्गत राजकीय किंवा बाहेरील इतर व्यक्ती कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांंची शिफारस त्याच्या वरिष्ठ किंवा समकक्ष अधिकाऱ्यांंकडे करू शकत नाही. जर नागपूर मनपात अधिकारी व कर्मचारी पदोन्नती, बदली किंवा इतर फायद्यांसाठी राजकीय व इतर दबाव निर्माण करत असतील तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत.
अनेकांचे आहेत राजकीय संबंध
नागपूर मनपामध्ये सत्तापक्ष व राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी यादी आहे. त्यामुळेच अनेक कर्मचारी बऱ्याच वर्षांपासून एकाच जागी आहेत. कुणाची ‘साईड पोस्टिंग’ झाली तर ते दबाव आणून आवडत्या पदावर जातात.