घराबाहेर निघाल तर खबरदार! पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:26 AM2020-03-24T00:26:35+5:302020-03-24T00:28:47+5:30

कोरोनाच्या रूपाने आलेले हे जीवघेणे संकट परतवून लावण्यासाठी दक्ष आणि सतर्क नागरिक म्हणून यावेळी तुम्ही घरीच बसा, असे भावनिक आवाहन नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लागू झालेल्या जमावबंदीच्या संबंधाने केले आहे.

Beware if you go out! Police Commissioner Bhushankumar Upadhyaya | घराबाहेर निघाल तर खबरदार! पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय

घराबाहेर निघाल तर खबरदार! पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय

Next
ठळक मुद्देप्रत्येक वाहनाला पोलीस पास आवश्यक : चार जण अन् पाच फुटाचे अंतर आवश्यक; सतर्क राहा, घरातच बसा

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत. तुम्हाला अत्यावश्यक काम असेल, आरोग्याची समस्या असेल तर पोलीस तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी तुम्हाला पोलीस आपले वाहनही उपलब्ध करून देतील. तुम्ही चिंता करू नका. मात्र, तुम्ही घरीच राहा. कारण तुमच्या घरी राहण्याने कोरोनाचा विषाणू इकडूनतिकडे जाणे-येणे करणार नाही. एकमेकांना संसर्ग होणार नाही. त्यामुळे कोरोनाच्या रूपाने आलेले हे जीवघेणे संकट परतवून लावण्यासाठी दक्ष आणि सतर्क नागरिक म्हणून यावेळी तुम्ही घरीच बसा, असे भावनिक आवाहन नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लागू झालेल्या जमावबंदीच्या संबंधाने केले आहे. खबरदार विनाकारण बाहेर निघाल तर पोलीस कारवाई करतील, असा इशाराही पोलीस यंत्रणेने नागपूरकरांना दिला आहे.
रविवारी देशभर जनता कर्फ्यू झाला. मात्र, सोमवारी सकाळपासून अनेक रिकामटेकडे, उपद्रवी मंडळी रस्त्यावर चौकाचौकात घोळक्याने फिरताना दिसत होती. काम नसताना काही जण दुचाकी, कारमध्ये फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीत हा प्रकार अतिशय गंभीरच नव्हे तर घातक आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने सविस्तर चर्चा केली. जमावबंदी म्हणजे काय, कुणाला फिरता येईल, काय आवश्यक आहे, कुणाला मनाई अन् कुणासाठी मुभा आहे, त्यासंबंधाने जनजागरण व्हावे म्हणून लोकमतने पोलीस आयुक्तांकडून सविस्तर माहिती घेतली. ते म्हणाले, कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता आपल्याला दक्ष राहून या संकटाचा मुकाबला करावा लागणार आहे. शासन, प्रशासन, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी हे संकट गाडून टाकण्यासाठी युद्धात लढावे त्याप्रमाणे रात्रंदिवस निकराची झुंज देत आहे. कायदा अन् सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसही रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत. कोरोना विषाणू संसर्गजन्य आहे, त्यामुळे एकापासून दुसऱ्याला आणि दुसºयापासून तिसºयाला असा संसर्ग होऊ शकतो. तो होऊ द्यायचा नाही, आपल्या शहरातील, राज्यातील आणि देशातील नागरिक स्वस्थ आणि सुरक्षित राहिले पाहिजे, यासाठीच शासनाने संचारबंदी घोषित केली आहे. संचारबंदी, जमावबंदीचा आदेश असा आहे की अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. आता चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच अर्थात् किराणा, अन्नधान्य, भाजीपाला, दूध, औषधे, ब्रेड-बेकरी हीच दुकाने सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तू, साहित्य आणि पशू खाद्याची वाहतूक करणाºया वाहनांना वाहतुकीला मुभा राहील. मात्र, या वाहनातही दोन किंवा तीन व्यक्ती पेक्षा जास्त कुणी बसू शकणार नाहीत, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

घराबाहेर निघाल तर खबरदार!
चार जणांपेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नये, असे जमावबंदीच्या आदेशात स्पष्ट आहे. मात्र, किराणा, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात चारपेक्षा जास्त लोकांची गर्दी झाली तर काय, असा प्रश्न उपस्थित केला असता कोणत्याही दुकानात चारपेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊच नये. बाकीच्यांनी त्यांची खरेदी झाल्यानंतर दुकानात जावे. प्रत्येक व्यक्तीत चार फुटांपेक्षा जास्त अंतर राहील, याचीही काळजी घ्यावी, असे पोलीस आयुक्त म्हणाले.

...तर पोलिसांचे वाहन मदतीला !
जीवनावश्यक वस्तूची विक्री करणाऱ्या दुकानाला जमावबंदीत परवानगी आहे. मात्र हे खरेदी करण्यासाठी निघालेल्यांचे वाहन बिघडले तर काय, त्यासाठी गॅरेज उघडे ठेवायला परवानगी नाही का, असा प्रश्न केला असता गॅरेज उघडे ठेवायला परवानगी नाही, असे पोलीस आयुक्त म्हणाले. एखादा रुग्ण घेऊन निघालेली अ‍ॅम्बुलन्स किंवा खासगी व्यक्तीचे वाहन रस्त्यात नादुरुस्त झाले तर त्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा १०० नंबरवर संपर्क करावा, लगेच त्या भागातील पोलिसांचे गस्ती वाहन मदतीला पोहचेल, असेही डॉ. उपाध्याय यांनी स्पष्ट केले.

  • खासगी दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावर आणण्यास बंदी घातली आहे.
  • सरकारी कर्मचारी, पत्रकार, विविध ठिकाणी नोकरीकरिता जाणाऱ्या लोकांची ओळखपत्रे पाहून त्यांची वाहने सोडावीत.
  • इतर लोकांना खासगी वाहनांचा वापर करायचा असेल तर वाहनधारकांनी पोलीस ठाण्यातून पास घ्यावी.
  • इमर्जन्सी असलेल्या वाहनांना पासेस नसले तरी काळजी करण्याची गरज नाही.
  • अत्यावश्यक सेवेची दुकाने व आस्थापना यांची शृंखला विस्कळीत करू नये.
  • दुकानांमध्ये वस्तू, भाजीपाला, फळे खरेदी करताना ग्राहकांनी रांगा कराव्यात व दोघांमध्ये कमीत कमी ५ फुटाचे अंतर ठेवावे.
  • पोलिसांनी या सर्व सूचना जनतेला माहीत व्हाव्या म्हणून पीए सिस्टिमवरून सांगाव्यात.
  • चेतक मोबाईल (गस्ती वाहन) मुख्य चौकात थांबवून तसेच गस्ती पथकाच्या वाहनांनी गल्लोगल्लीत फिरून या सूचना अनाऊन्स कराव्या.
  • नागरिकांना घराबाहेर न पडण्याबाबत व घरीच राहण्याबाबत वारंवार सांगावे.

 

हे चालणार नाही !
सहज फेरफटका मारण्यासाठी किंवा टिंगलटवाळी करण्यासाठीही काही उत्साही, उपद्रवी मंडळी घराबाहेर फिरत असल्याचे आज ठिकठिकाणी पोलिसांच्या नाकेबंदीतून दिसून आले. प्रत्येकच जण आपल्याला आवश्यक काम असल्याचे सांगून पोलिसांना चुकविण्याचे प्रयत्न करीत होता. यातील काहींनी बेजबाबदारपणाचा कहर केला. तंबाखू आणायला जात आहे, असे तो म्हणाला. एकाला चहाची तलफ आली, तो कुठे मिळते म्हणून तो गिट्टीखदानमधून सोनेगावपर्यंत फिरत होता. आज पोलिसांनी अशा अनेकांना ‘मागच्या बाजूला’ फटकेबाजी करून सोडले. आजनंतर असे चालणार नाही. अशा नमुन्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

वाहनांना पोलीस पास आवश्यक !
आजपासून खासगी वाहनांना रस्त्यावरून धावण्यास पुरती मनाई आहे. किराणा, दूध, भाजीपाला, ब्रेड, अन्नधान्य, औषधांची वाहतूक करायची आहे, असे सांगून जमणार नाही. अशा जीवनावश्यक सेवेसाठी धावणाऱ्या वाहनाच्या चालकांना आधी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील पोलीस ठाण्यातून पास मिळेल. ही पोलीस पास दाखवूनच वाहनचालक इकडून तिकडे जाऊ-येऊ शकेल. पेशंट घेऊन जाणाऱ्याला त्याचे ओळखपत्र किंवा आधारकार्ड जवळ ठेवावे लागेल. त्यांना पासची गरज नाही. रुग्णाला घेऊन जाणाऱ्या व्यतिरिक्त प्रत्येक वाहनचालकाला पोलीस पास आवश्यक राहणार आहे. अन्यथा त्या वाहनचालकांवर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

पत्रकार, शासकीय कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आवश्यक!
विविध वृत्तपत्रात, प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना कसलाही त्रास होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. त्यांना कोणत्याही पासची आवश्यकता नाही. मात्र, त्यांना आपले ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. यांच्या व्यतिरिक्त विनाकारण कुणी घराबाहेर फिरताना आढळल्यास पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील, असेही डॉ. उपाध्याय म्हणाले.

Web Title: Beware if you go out! Police Commissioner Bhushankumar Upadhyaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.