सावधान ‘ओएलएक्स’ मध्ये सायबर गुन्हेगारांची घुसखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 08:15 PM2020-08-04T20:15:03+5:302020-08-04T20:17:16+5:30
ओएलएक्सवर दुचाकीची खरेदी करू पाहणाऱ्या एका तरुणाची सायबर गुन्हेगाराने फसवणूक करून ३८ हजार रुपये लंपास केले. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओएलएक्सवर दुचाकीची खरेदी करू पाहणाऱ्या एका तरुणाची सायबर गुन्हेगाराने फसवणूक करून ३८ हजार रुपये लंपास केले. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, ५ जुलैला ११ वाजता त्याने त्याच्या मोबाईलवर ओएलएक्स अॅपवर विकास पटेल नामक आरोपीची अॅक्टिव्हा विकायची आहे, अशी जाहिरात बघितली. तेथे नमूद मोबाईल क्रमांकावर पीडित व्यक्तीने संपर्क केला. आरोपी पटेलने आपण आर्मीमध्ये आहे, असे सांगून स्वत:चे बनावट ओळखपत्रही पाठवले. १७ हजार रुपयात अॅक्टिव्हा विकण्याचा सौदा करून आरोपीने फोन पे वरून फिर्यादीला प्रारंभी २१५० रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराने दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क करून रक्कम ट्रान्सफर करायला सांगितली. एकूण ११,९९९ रुपये ट्रान्सफर केल्यानंतर आरोपीने युनियन बँकेचे एटीएम कार्ड दोन्हीकडून झेरॉक्स करून पाठवण्यास सांगितले. ते पाठविल्यानंतर पीडित तरुणाच्या बहिणीच्या नावाने असलेल्या बँक खात्यातूनही आरोपींनी १८,९८९ रुपये काढून घेतले. त्यानंतरही वेगवेगळे कारण सांगून एकूण ३८ हजारांची रक्कम उकळली. अशाप्रकारे रक्कम घेतल्यानंतर दुचाकी मात्र दिलीच नाही. त्याबाबत तगादा लावल्याचे पाहून आरोपीने संपर्क क्रमांक बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. चौकशीअंती या प्रकरणात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.