सावधान, कमी झोपेमुळे प्रतिकारशक्ती खालावते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:10 AM2021-08-27T04:10:14+5:302021-08-27T04:10:14+5:30
नागपूर : अपूर्ण किंवा कमी दर्जाच्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक व्याधी जडतात. जगात ४५ टक्के लोक झोपेशी जुळलेल्या रोगाशी ...
नागपूर : अपूर्ण किंवा कमी दर्जाच्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक व्याधी जडतात. जगात ४५ टक्के लोक झोपेशी जुळलेल्या रोगाशी सामना करीत आहेत. पुरेशी झोप न झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन कोरोना होण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढत असल्याचा निष्कर्ष नागपूर मेडिकलच्या श्वसनरोग विभागाने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून काढला.
मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख व निद्रा विशेषज्ञ डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले, झोपेचे दोन टप्पे आहेत. ‘रेम स्लीप’ व दुसरी ‘नॉन रेम स्लीप.’ पहिल्या टप्प्यात स्वप्न पडतात, तर दुसऱ्या टप्प्यातील झोप खरी झोप असते. या पायऱ्या आलटून पालटून येतात व त्यांचा कालावधी वेगवेगळा असतो. अनेकांची, आपण खूप वेळ झोपतो तरी झोप झाल्यासारखे वाटत नाही, ‘फ्रेश’ वाटत नाही, अशी तक्रार असते. यांच्या बाबतीत ‘डीप स्लीप’ची पायरी खूप कमी वेळा येते व कमी काळ टिकते. तीव्र निद्रानाशाचा त्रास बराच काळ असेल, तर वेळ न दवडता तज्ज्ञांना भेटावे, असेही डॉ. मेश्राम म्हणाले. डॉ. मेश्राम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या अभ्यासात ६३ टक्के बाधितांना कोरोना होण्यापूर्वी झोपेची समस्या होती. पुरेशी झोप न झाल्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली होती. परिणामी, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला.
-निद्रानाशाची कारणे
आयुष्यातील महत्त्वाच्या तणावकारक घटना, नैराश्य, असुरिक्षतता, भीती, सततची रात्रपाळीतील कामे, व्यसन, मोबाइल्स किंवा इंटरनेटचे व्यसन, जुना ताणतणावाचा आजार.
-संतुलित आहार व व्यायामही आवश्यक
तज्ज्ञाच्या मते, झोप आणि आहार यांचा बरोबरीचा संबंध आहे. चांगल्या झोपेसाठी तेलकट व मसालेदार पदार्थ टाळायला हवेत. पालेभाज्या, फळे, पनीर, चीज, सी-फूड, डाळींचा समावेश करायला हवे. यांच्या सेवनामुळे शरीरातील शिरांमध्ये ताण कमी होऊन चांगली झोप लागते. यासोबतच नियमित व्यायामही आवश्यक आहे.
-झोपेसासाठी तीन घटना महत्त्वाच्या
झोप लागणे, ती अखंड टिकणे आणि झोपेतून जागे झाल्यावर ताजेतवाने वाटणे, ही निरामय स्थितीची लक्षणे आहेत. या तिन्ही घटनांपैकी कोणतीही एक किंवा तिन्हींमध्ये आलेल्या अडचणीला निद्रानाश म्हणतात. दीर्घ काळ निद्रानाश हे मानसिक संतुलन बिघडण्यासोबतच कॅन्सर, आर्थ्रायटीस, मधुमेह, हृदयरोगासाठीही कारणीभूत ठरते. श्वसनरोग विभागाने कोरोनाचा रुग्णांवर केलेल्या अभ्यासात ६३ टक्के लोकांमध्ये झोपेची समस्या आढळून आली. निद्रानाशामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती खालावली होती.
-डॉ. सुशांत मेश्राम, विशेषज्ञ निद्रा, प्रमुख श्वसनरोग विभाग, मेडिकल