सायबर भामट्यांपासून सावध राहा, बनावट मेसेजना बळी पडू नका, महावितरणचे आवाहन

By आनंद डेकाटे | Published: October 30, 2023 04:47 PM2023-10-30T16:47:54+5:302023-10-30T16:48:26+5:30

ग्राहकाने वीजबिल थकविले तर त्याचा वीजपुरवठा पूर्वसूचना देऊन खंडीत करण्याची महावितरणची नियमित पद्धती

Beware of cyber scams, don't fall prey to fake messages, appeals to Mahavitran | सायबर भामट्यांपासून सावध राहा, बनावट मेसेजना बळी पडू नका, महावितरणचे आवाहन

सायबर भामट्यांपासून सावध राहा, बनावट मेसेजना बळी पडू नका, महावितरणचे आवाहन

नागपूर : महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कंपनी एसएमएस किंवा ऑनलाईन बिले भरण्याची सुविधा सुरक्षित असेल याची दक्षता घेत असते. ग्राहकांनी महावितरणची कार्यपद्धती समजून घ्यावी. ग्राहकांनी अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या बनावट मेसेजना बळी पडू नये व वीजग्राहकांना लुटणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

महावितरणकडून ग्राहकांना जो एसएमएस पाठविला जातो त्यामध्ये मेसेज पाठविणाऱ्याचा नावात स्पष्टपणे एमएसईडीसीएल असा कंपनीचा उल्लेख असतो. महावितरण कधीही खासगी क्रमांकावरून एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेश पाठवत नाही. महावितरणची बिले ऑनलाईन भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवर सुविधा असून लाखो ग्राहक तिचा वापर करत आहेत. पण महावितरण बिलासाठी एखाद्या नंबरवर अधिकाऱ्यास संपर्क साधण्यास सांगत नाही. महावितरण कोणालाही फोनवरून ओटीपी विचारत नाही.

सायबर भामट्यांकडून पाठवलेल्या वैयक्तिक नंबरवर ग्राहकाने संपर्क साधला तर त्याला त्याच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा ताबा घेता येईल असे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते किंवा एखादी बनावट लिंक पाठविली जाते. त्याचा वापर करून भामटे ग्राहकाची बँकेविषयीची गोपनीय माहिती चोरतात आणि फसवणूक करतात. ग्राहकांनी ओटीपी शेअर केला नाही तर फसवणूक रोखण्यास मदत होईल. ग्राहकाने वीजबिल थकविले तर त्याचा वीजपुरवठा पूर्वसूचना देऊन खंडीत करण्याची महावितरणची नियमित पद्धती आहे. ताबडतोब बिल भरा नाहीतर रात्री वीजपुरवठा खंडित करू असे धमक्या दिल्यासारखे संदेश महावितरण कधीही पाठवत नाही. महावितरणचे तक्रार नोंदविण्याचे टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ तसेच १८००-२१२- ३४३५ असे क्रमांक आहेत. त्यावर मोफत फोन करता येतो. महावितरण कधीही ग्राहकांना एखाद्या व्यक्तीच्या खासगी मोबाईल क्रमांकावर फोन करण्यास सांगत नाही.

- फसवणूक झाल्यास लगेच करा तक्रार

महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात मुख्य कार्यालयाने तसेच प्रादेशिक कार्यालयांनी राष्ट्रीय सायबर अपराध रिपोर्टिंग पोर्टलवर अनेकदा तक्रारी देखील नोंदविल्या आहेत. सायबर पोलीस ठाण्यात देखील फिर्याद दाखल केली असून फसवणुकीच्या संदर्भात पोलीस कारवाई करत आहेत. महावितरणच्या ग्राहकांची सायबर भामट्यांकडून फसवणूक झाल्याचे समजले तर स्थानिक पोलीसांकडे पाठपुरावा करण्याच्या सुचना देखील महावितरणच्या कार्यालयांना देण्यत आल्या आहेत.

Web Title: Beware of cyber scams, don't fall prey to fake messages, appeals to Mahavitran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.