‘एच३एन२’ पासून सावध रहा; एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचा इशारा
By सुमेध वाघमार | Published: March 12, 2023 08:31 PM2023-03-12T20:31:49+5:302023-03-12T20:31:58+5:30
‘एच३एन२’ हा विषाणू नवीन नाही. परंतु यावेळी त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
नागपूर : ‘एच३एन२’ हा विषाणू नवीन नाही. परंतु यावेळी त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सहव्याधी असलेले रुग्ण, ज्येष्ठ नागरिक व ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे त्यांना या आजारात गंभीर परिस्थतीचा सामना करावा लागू शकतो, यामुळे सावध राहण्याचा सल्ला दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला.
अकादमी आॅफ मेडिकल सायन्सेसच्यावतीने नागपुरात ‘अॅम्सकॉन-२०२३’ या परिषदेचे उद्घाटन रविवारी झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. गलेरिया म्हणाले, ‘एच३एन२’ या विषाणूचे रुग्ण आपल्याकडे दरवर्षी पावसाळा, हिवाळ्यात व ऋतु बदल होत असताना दिसून येतात. कोरोनाचा काळात आपण मास्क घालणे, अंतर पाळणे, वारंवार हात धुणे हे कटाक्षाने पाळल्याने याचे रुग्ण कमी होते. आता सर्वांचेच याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे मोठ्या संख्येत रुग्ण दिसून येत आहेत. यामुळे पुन्हा कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.