दोन समाजात हिंसा भडकवायचा प्रयत्न, चिथावणी देणाऱ्यांपासून सावध राहा; मोहन भागवतांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 06:02 AM2023-10-25T06:02:55+5:302023-10-25T06:04:51+5:30
राम मंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशाने, प्रत्येकाच्या हृदयात आपल्या मनातील राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : देशात काही तत्वांकडून चिथावणी देत हिंसा भडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपापसातील संघर्ष वाढत जावेत यासाठीही जोरदार प्रयत्न होत आहेत. या गोष्टींना वेळेत ओळखून समाजाने या अपप्रचाराच्या मायाजालातून स्वतःला बाहेर काढावे, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवात ते बोलत होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन उपस्थित होते.
भागवत म्हणाले की, निवडणूकीत भावना भडकावून मते मिळविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहा. राजकीय स्वार्थासाठी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अशा अनिष्ट शक्तींशी युतीचा अविवेक केला जात आहे, असेही ते म्हणाले.
मणिपूर हिंसाचारावर...
मणिपूरमधील हिंसेबाबत सरसंघचालकांनी चिंता व्यक्त केली. हा हिंसाचार नियोजितरित्या करण्यात आला. या हिंसाचारामागे सीमेपलीकडील अतिरेकीही होते का? या परस्पर संघर्षाला जातीय वा धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न का? असे प्रश्न त्यांनी केले.
कुणाला कराल मतदान?
येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भावना भडकावून मते मिळविण्याचे प्रयत्न होतील. देशाची एकात्मता, अखंडता, अस्मिता आणि विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान करावे. जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील सर्वात चांगल्या पर्यायाला मतदान करा.
रामललाची प्राणप्रतिष्ठा...
२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होईल. राममंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशाने, प्रत्येकाच्या हृदयात आपल्या मनातील राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी, असे आवाहन सरसंघचालकांनी यावेळी केले.