आॅनलाईन फसवणुकीपासून सावध राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:05 PM2018-07-11T23:05:48+5:302018-07-11T23:06:51+5:30

आॅनलाईन फसवणुकीच्या घटना अलीकडे वाढत आहे. त्यातच बँकेतून अधिकारी बोलतो, एटीएमची मुदत संपली, तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी (वन टाईम पासवर्ड) पाठवा अशा भूलथापा देत लुबाडणुकीचे प्रकार वाढले आहेत. याकडे लक्ष वेधत अशा फसवणुकींपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. सोबतच ‘सोशल मीडिया’वर अकाऊंट हाताळतानाही काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

Beware From Online Fraud! | आॅनलाईन फसवणुकीपासून सावध राहा!

आॅनलाईन फसवणुकीपासून सावध राहा!

Next
ठळक मुद्देनागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे आवाहन : ‘सोशल मीडिया’द्वारेही होऊ शकतो घात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आॅनलाईन फसवणुकीच्या घटना अलीकडे वाढत आहे. त्यातच बँकेतून अधिकारी बोलतो, एटीएमची मुदत संपली, तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी (वन टाईम पासवर्ड) पाठवा अशा भूलथापा देत लुबाडणुकीचे प्रकार वाढले आहेत. याकडे लक्ष वेधत अशा फसवणुकींपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. सोबतच ‘सोशल मीडिया’वर अकाऊंट हाताळतानाही काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी फसवणुकीच्या घटना समोर आल्या. एटीएम बदलवून फसवणूक करणे, आॅनलाईन व्यवहारात फसवणूक, बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करीत तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे वळते करणे असे प्रकार घडलेले आहेत. यासाठी नागरिकांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे. सोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फ्लेक्स, बॅनर, पत्रके वाटण्यासोबतच नागपूर ग्रामीण पोलीस दलातर्फे चर्चासत्र घेण्यात येत आहे.
एटीएम कार्ड बदलविणे, ओटीपी मागविण्यासोबतच अलीकडे तुम्हाला पाच लाखांचे बक्षीस लागले आहे, अशी नवीन शक्कल चोरट्यांनी लढविली आहेत. यामध्ये वेबसाईटवर वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखविले जाते. त्या आमिषाला बळी पडल्यास फसवणूक होते. हे टाळण्यासाठी ‘एचटीटीपी’ (हायपर टेस्क्ट प्रोटोक्रॉल) ऐवजी ‘एटीटीपीएस’ (हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल) पासून तयार होणाऱ्या वेबसाईटला प्राधान्य द्यावे. त्या वेबसाईट या सुरक्षित असतात, असे पोलिसांनी म्हटले आहे. आॅनलाईन फसवणूक झाल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याला सूचना द्यावी. सर्वच पोलीस ठाण्याला तशा सूचना देण्यात आल्या असून फसवणूक झाल्यास संबंधिताकडून कोणती माहिती घ्यायची याबाबतचा नमुना अर्ज पाठविला आहे. जेवढ्या लवकर ही प्रक्रिया कराल, तेवढे उत्तम असून पैसे परत मिळण्याची खात्री अधिक राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
एटीएमद्वारे सुट्यांच्या दिवसांत फसवणूक
एटीएमची मुदत संपलेली आहे, त्यावरील क्रमांक पाठवा, आता ओटीपी येईल असे सांगून फसवणूक करण्याच्या घटना या मुख्यत: शनिवार-रविवारी किंवा सलग सुट्या असलेल्या दिवसांमध्ये अधिक होतात. सुटीच्या दिवशी फसवणूक झाली तरी ग्राहक त्याच्याकडून आवश्यक कागदपत्रे बँकेला सुटीच्या दिवशी पोहोचवू शकत नाही. त्यामुळे चोरट्यांचे फावते. याबाबत नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी केले आहे.
वैयक्तिक माहिती अपलोड करू नका
‘सोशल मीडिया’वर विशेषत: फेसबुकवर स्वत:चे फोटो, कुटुंबाचे फोटो आणि इतर वैयक्तिक माहिती अपलोड केली जाते. ती माहिती चोरली जाण्याची अधिक शक्यता असते. त्यातच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांच्या फोटोचा गैरवापर केला जाऊ शकतो. फेसबुकवर अनेक महिलांचे, तरुणींचे बनावट अकाऊंट तयार करून फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. त्यामुळे ‘सोशल मीडिया’ हाताळताना काळजी घ्या, आक्षेपार्ह संदेश वा अफवा पसरवू नका, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

Web Title: Beware From Online Fraud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.