आॅनलाईन फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा!
By admin | Published: October 25, 2014 02:39 AM2014-10-25T02:39:54+5:302014-10-25T02:39:54+5:30
हल्ली विविध आमिष दाखवून आॅनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. त्यामुळे ...
नागपूर : हल्ली विविध आमिष दाखवून आॅनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही फायनन्स कंपनींच्या आॅनलाईन अथवा इतर जाहिरातींवर किंवा अनोळखी व्यक्तींच्या फोनवरील संभाषणावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आर्थिक योजनांचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन सुविधा आहे. मात्र, काही संस्था अथवा व्यक्ती नागरिकांची फसवणूक करण्यासाठी बनावट वेब पेज तयार करतात. योजनांचा लाभ घेण्ण्यासाठी नागरिकांना आॅनलाईन अर्ज भरण्याचे आवाहनही करतात. सदर अर्ज भरताना अर्जदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम कार्ड पासवर्ड, ई-मेल आयडी यासह अन्य महत्त्वाच्या बाबी भरायला लावतात. या माहितीच्या आधारे फसवणूक करणारी टोळीतील सदस्य बनावटी सिमकार्डचा वापर करून नागरिकांशी संपर्क साधतात. प्रसंगी एसएमएस करतात.
यातून नागरिकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घडल्या आहेत. त्यामुळे कोणत्यााही जाहिराती बारकाईने वाचून त्याची शहानिशा केल्यानंतर त्यावर अंमल करावा. अनोळखी व्यक्तीशी मोबाईलवर संभाषण करणे टाळावे. अनोळखी व्यक्तीस आपले नाव, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, ई-मेल आडी, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम कार्ड पासवर्ड सांगू नये किंवा एसएमएसद्वारे पाठवू नये. यासाठी कुणी आमिष दाखविल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात संबंधिक कार्यालयातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. या संदर्भात संशयास्पद माहिती आढल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन नागपूर ग्रामीण पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)