सावधान! फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक, दरवर्षी पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 05:30 AM2024-10-29T05:30:06+5:302024-10-29T05:30:42+5:30
देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते. विविध फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका अधिक वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
नागपूर : दिवाळी म्हणजे अमावस्येच्या काळोखाला भेदणारा प्रकाशाचा सण. रोषणाईचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. पण कधी कधी अति उत्साहात सुरक्षेकडे जरा दुर्लक्ष होते. विशेषत: फटाक्यांमुळे अंधत्वाची जोखीम निर्माण होते. देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते. विविध फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका अधिक वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
फटाक्यांमुळे अंधत्वाचे प्रमाण जागतिक पातळीवर पाच लाखांवर आहे. फटाका फुटल्यानंतर निघणारा धूर डोळ्यांना व फुफ्फुसांना, तसेच त्वचेला अपायकारक असतो. बंगळुरू येथील शासकीय मिंटो ऑप्थल्मोलॉजी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नोंदीनुसार, २००८ ते २०२० या कालावधीत फटाक्यांमुळे डोळ्यांना झालेल्या दुखापतींवरील व रुग्णालयात उपचार करण्यात आले. यात फटाक्यांमुळे डोळ्यांच्या दुखापतींपैकी १६ वर्षांखालील मुलांचा वाटा ४९.३ टक्के आहे.
असा हाेईल धाेका...
फटाके फुटल्यानंतर दगड, माती वेगाने उडते व डोळ्याला व इतर अवयवांना इजा होऊ शकते. फटाक्यात जळती ठिणगी किंवा घटक गेल्यास डोळा कायमचा निकामी होण्याची शक्यता असते.