खबरदार! नायलॉन मांजा विकाल, वापराल तर थेट गुन्हेच नोंदविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 12:43 PM2023-01-09T12:43:11+5:302023-01-09T12:44:28+5:30

जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर : सायबर सेलचा ऑनलाइन मांजा विक्रीवरही 'वॉच'

beware, use or sell of banned nylon manja could send you jail | खबरदार! नायलॉन मांजा विकाल, वापराल तर थेट गुन्हेच नोंदविणार

खबरदार! नायलॉन मांजा विकाल, वापराल तर थेट गुन्हेच नोंदविणार

Next

नागपूर : प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्री व वापराविरुद्ध जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. प्रशासनाने यासाठी जिल्ह्यात महापालिका क्षेत्रात झोननिहाय तसेच नगरपालिका क्षेत्र व ग्रामीण भागातदेखील टास्क फोर्स समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांनी संबंधित पोलिस ठाणेदार यांच्या समवेत नायलॉन मांजा विक्री होत असलेल्या तसेच नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हे नोंदवून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

नायलॉन मांजाच्या' वापराविरुद्ध कारवाईचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती सभागृह येथे रविवारी बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, पोलिस उपायुक्त मुमक्का सुदर्शन, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी अतुल पंत तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या तस्करांवर छापे; ५ आरोपी अटकेत

जिल्हाधिकाऱ्यांनी परराज्यातून येणाऱ्या नायलॉन मांजावर आळा घालण्यासाठी पोलिस चेकपोस्ट अॅक्टिव्ह करण्याचे तसेच सायबर सेलने ऑनलाइन मांजा विक्रीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. ज्या भागात पतंग जास्त प्रमाणात उडविले जातात, अशा भागात विशेष लक्ष ठेवण्याचे व जनजागृती करण्यास सांगितले.

मकरसंक्रांतीपर्यंत शाळेत दररोज घेतली जाणार शपथ

'मी पतंग उडविताना नायलॉन मांजा वापरणार नाही आणि इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरू देणार नाही, या आशयाची प्रतिज्ञा सर्व शासकीय व खासगी शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मकरसंक्रांतीपर्यंत रोज घ्यावी, असे. आवाहन त्यांनी केले आहे. यासोबत पालकांनो, आपला पाल्य पतंग उडवताना कोणता मांजा वापरतो आहे, याकडे लक्ष ठेवण्याचे व नायलॉन मांजा वापरल्यास कारवाई होऊ शकते, अशी समज आपल्या पाल्यांना देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पालकांना केले आहे.

येथे करा तक्रार

नायलॉन मांजा बाबत तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापण्यात आला आहे. नागरिकांना ०७१२-२५६२६६८ किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ यावर तसेच जवळच्या महानगरपालिका झोन कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती कार्यालय येथे देखील नायलॉन मांजाबाबत तक्रारी दाखल करता येतील.

Web Title: beware, use or sell of banned nylon manja could send you jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.