बानाईत यांच्या रुपाने विदर्भ वैधानिक मंडळाला मिळाल्या सदस्य सचिव; शर्मा नागपूर जि.प.च्या सीईओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 05:40 PM2022-11-30T17:40:05+5:302022-11-30T17:46:51+5:30

एस. एम. कुर्तकोटी भंडारा जि.प.चे सीईओ

Bhagyashree Banayat appointed as Vidarbha Statutory Development Board Secretary while Saumya Sharma as CEO of Nagpur ZP | बानाईत यांच्या रुपाने विदर्भ वैधानिक मंडळाला मिळाल्या सदस्य सचिव; शर्मा नागपूर जि.प.च्या सीईओ

बानाईत यांच्या रुपाने विदर्भ वैधानिक मंडळाला मिळाल्या सदस्य सचिव; शर्मा नागपूर जि.प.च्या सीईओ

Next

नागपूर : राज्य सरकारने मंगळवारी काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या¸मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नांदेडच्या सहायक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांची तर भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एस. एम. कुर्तकोटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बानाईत यांच्या रुपाने विदर्भ वैधानिक विकास मंडळाला अखेर वर्षभरानंतर प्रमुख मिळाला आहे. नागपूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांची भंडारा येथील जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी भाग्यश्री विसपुते यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्या रुजू न झाल्याने सामान्य प्रशासन विभागाने त्यांची बदली रद्द केली. आता या जागी सौम्या शर्भा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौम्या शर्मा यांचा संघर्षमय प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आहे. ऐकण्याची क्षमता नसतानाही त्यांनी प्रचंड मेहनत करून २०१७ च्या यूपीएससी परीक्षेत नुसते यश मिळवले नाही तर त्यांनी देशात ९ वा क्रमांक मिळविला होता.

ऑगस्ट २०२१ मध्ये गडचिरोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे विदर्भ वैधानिक विकास मंडळाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांची बदली झाली तेव्हापासून मंडळाचे सचिवपद रिक्त होते. सुत्रांच्या माहितीनुसार मंडळाचे पुनर्जीवन करण्याच्या दृष्टीने सरकारने मंडळाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.

कुर्तकोटी यांच्या नियुक्तीने सावळागोंधळ चव्हाट्यावर

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना राज्य सरकारमध्ये सावळागोंधळ असल्याची बाब समोर आली आहे. आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दर आठ-पंधरा दिवसांनी निघत आहेत आणि त्यात इतका गोंधळ आहे की एकेका अधिकाऱ्याची कशी दर महिन्याला बदली होत आहे. याचे नमुनेदार उदाहरण मंगळवारी भंडारा जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर बदली झालेले समीर माधव कुर्तकोटी यांच्या रूपाने समोर आले आहे.

महाराष्ट्र प्रशासकीय सेवेतून एस. एम. कुर्तकोटी यांच्यासह भानुदास पालवे, संतोष पाटील, ज्ञानेश्चर खिलारी व रमेश चव्हाण या पाचजणांना गेल्या २९ सप्टेंबरला आयएएस दर्जा मिळाला. त्यावेळी ते अमरावती येथे विभागीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर १२ ऑक्टोबरला कुर्तकोटी यांची पदोन्नतीवर नंदुरबार जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून नियुक्ती झाली. तिथून त्यांची १७ नोव्हेंबरला बुलडाणा जि. प. सीईओ म्हणून बदली करण्यात आली आणि मंगळवारी भंडारा जिल्हा परिषदेत पाठविण्यात आले.

Web Title: Bhagyashree Banayat appointed as Vidarbha Statutory Development Board Secretary while Saumya Sharma as CEO of Nagpur ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.