परिश्रमाने घडविले नागपूरच्या भाग्यश्रीने भाग्य; नागालॅण्ड सरकारमध्ये गृहविभागाच्या उपसचिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:08 AM2018-03-08T10:08:43+5:302018-03-08T10:08:53+5:30
तिने स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी स्वत:ला झोकून दिले प्रयत्नांच्या यज्ञकुंडात. आज ती आयएएस अधिकारी म्हणून कर्तृत्व गाजवतेय. भाग्यश्री बानाईत- धिवरे असे या धैर्यवान तरुणीचे नाव.
लोकमत न्यूज नेटवर्क
शफी पठाण
नागपूर; ज्याच्याकडे स्वप्ने नाहीत तो तरुणच नाही, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. म्हणूनच तिने स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी स्वत:ला झोकून दिले प्रयत्नांच्या यज्ञकुंडात. तिचे हे परिश्रम अखेर कामी आले आणि आज ती आयएएस अधिकारी म्हणून कर्तृत्व गाजवतेय. भाग्यश्री बानाईत- धिवरे असे या धैर्यवान तरुणीचे नाव.
जिद्द, चिकाटी, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वात कठीण परीक्षा तिने पास केली आहे. समाज व देशासाठी काहीतरी करण्याची संधी भारतीय प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून मिळते, हे भाग्यश्रीला चांगले माहीत होते. कारण, या सेवेबद्दल वडिलांनीच तिला लहानपणापासून प्रोत्साहित केले होते. त्या दिशेने तिने प्रवास सुरू केला. शिक्षण, नोकरी, आई व स्वत:चे आजारपण यावर मात करून रणरागिणीप्रमाणे लढत २०१२ च्या युपीएससी परीक्षेत यश संपादन केले. जन्म नागपूर जिल्ह्यातील असला तरी, शिक्षण अमरावती, यवतमाळ येथे झाले. मोर्शी सारख्या तालुक्यात युपीएससी, एमपीएससीची माहितीच कुणाला नव्हती. सुरुवातीला एमपीएससीची तयारी केली. त्यातून सेलटॅक्समध्ये अधिकारी म्हणून रुजू झाल्या. परंतु त्यांची कुशाग्र बुद्धी, जिद्द, परिश्रम घेण्याची तयारी, मोठे प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर त्या युपीएससीच्या तयारीला लागल्या. वडिलांचे अचानक जाणे त्यांच्या प्रयत्नात मोठाच आघात होता. आईची सातत्याने खराब होत असलेली प्रकृती, घर सांभाळणे आणि अवघड असलेली परीक्षेची तयारी असे चौतर्फी आव्हान समोर उभे होते. पण, त्या माघारी फिरल्या नाहीत. या आव्हानांना थेट भिडल्या. खंबीरपणे त्यांचा सामना केला आणि नागालॅण्ड कॅडरमध्ये नियुक्त झाल्या. आज त्या नागालॅण्ड सरकारमध्ये गृहविभागाच्या उपसचिव म्हणून सेवा देत आहेत. निव्वळ अभ्यासूवृत्तीच नाही, तर उत्तम लेखक, कवी आहेत. त्यांचा स्वप्नगंध हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातून आल्याने सामाजिक जाणीव त्यांना आहे. विदर्भातील जास्तीत जास्त मुले प्रशासकीय सेवेत यावीत म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या जातात. त्यांच्यासाठी शिबिर घेतात. नागालॅण्ड सरकारमध्ये कार्यरत असताना तेथील महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना किती सक्षमतेने राबविता येईल, यासाठी दक्ष असतात. भाग्यश्री बानाईत- धिवरे यांच्या कर्तृत्वाला आजच्या महिला दिनी आमचा सलाम.