भाग्यश्री नवटकेची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 01:11 AM2018-12-08T01:11:00+5:302018-12-08T01:12:56+5:30
दलित-मुस्लीम यांचेवर जातीय व धर्मांधतेच्या द्वेषातून अत्याचार केल्याचा बीडच्या पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत नांदेडचे आयजी व बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दलित-मुस्लीम यांचेवर जातीय व धर्मांधतेच्या द्वेषातून अत्याचार केल्याचा बीडच्या पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत नांदेडचे आयजी व बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार आहे.
बीडच्या माजी पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. यात त्या दलितांवर खोट्या केसेस लावून त्यांना मारहाण करीत असल्याचे सांगत आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात सर्वत्र असंतोष पसरला आहे. राजकीय पक्षासह विविध संघटनांनी नवटके यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली आहे. जाती-जमाती आयोगापासून तर थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदने पाठवली जात आहे. यातच काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश समितीने अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे या प्रकरणाची तक्रार केली. आयोगाने याची गंभीर दखल घेत नांदेडचे आयजी आणि बीडचे दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना नोटीस पाठवून नवटके यांनी आपले कर्तव्य बजावताना चुका केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली आहे.
जाती-जमाती आयोगाने बजावलेल्या या नोटीस नंतरच नवटके यांची तातडीने बदली करण्यात आली. आता या नोटीस अंतर्गत एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत (नवटके यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेले) चौकशी करण्यात येईल. ही चौकशी होत असताना त्यांनी खरेच कुणावर अत्याचार केलेत त्या पीडितांची सर्व प्रकरणेही समोर येतील.
नोटीसमुळेच तातडीने बदली
यासंदर्भात राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आयोगाने गेल्या सोमवारीच नोटीस बजावली आहे. नागरिकांचा दबाव आणि आयोगाची नोटीस यामुळेच त्यांची तातडीने बदली करण्यात आली. आता त्यांची चौकशी केली जाईल. चौकशीत त्या दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर अॅट्रासिटी अॅक्टच्या सेक्शन ४ अंतर्गत कारवाई होऊ शकते. यात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.