भाग्यश्री वासनकरला हायकोर्टात जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:17 AM2017-09-08T01:17:25+5:302017-09-08T01:17:40+5:30
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात असलेल्या भाग्यश्री वासनकरला गोंदियातील प्रकरणामध्ये सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात असलेल्या भाग्यश्री वासनकरला गोंदियातील प्रकरणामध्ये सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी गुरुवारी हा निर्णय दिला.
गोंदियातील प्रकरणात भाग्यश्रीची जाऊ मिथिलाला आधीच जामीन मिळाला आहे. या प्रकरणात फसवणुकीची रक्कम इतर प्रकरणांच्या तुलनेत कमी आहे. तसेच, पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. उच्च न्यायालयाने भाग्यश्रीला जामीन देताना यासह विविध बाबी लक्षात घेतल्या. यापूर्वी उच्च न्यायालयाने तिला नागपूर व अमरावती येथील प्रकरणात दोन महिन्यांचा तात्पुरता जामीन दिला आहे. तात्पुरत्या जामिनाची मुदत ५ आॅक्टोबर रोजी संपणार आहे. त्यानंतर भाग्यश्रीतर्फे तात्पुरता जामीन कायम करण्याची विनंती केली जाऊ शकते. विनंती खारीज झाल्यास तिला परत कारागृहात जावे लागेल.
शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाºया वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकर याची भाग्यश्री ही पत्नी होय. आरोपी चर्चासत्र आयोजित करून गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजाच्या मोहात पाडत होते. भाग्यश्रीतर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी व अॅड. देवेंद्र चव्हाण तर, शासनातर्फे अॅड. संजय डोईफोडे व अॅड. कल्याणी देशपांडे यांनी बाजू मांडली.