नागपुरात पोलीस अधिकाऱ्याच्या गुंड मुलाची भाईगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 10:22 PM2018-04-10T22:22:35+5:302018-04-10T22:22:54+5:30
दारूच्या नशेत टुन्न असलेल्या दोघांनी लोकमत टाइम्सचे सहायक संपादक आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. वेळीच काही पत्रकार आणि पोलिसांचे गस्ती वाहन पोहोचल्याने त्रिपाठी बचावले. हल्ला करणाऱ्यांमध्ये एक आरोपी पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे समजते. सोमवारी मध्यरात्रीनंतर काटोल नाका चौकात ही संतापजनक घटना घडली. यामुळे पत्रकार जगतात तीव्र रोष निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूच्या नशेत टुन्न असलेल्या दोघांनी लोकमत टाइम्सचे सहायक संपादक आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. वेळीच काही पत्रकार आणि पोलिसांचे गस्ती वाहन पोहोचल्याने त्रिपाठी बचावले. हल्ला करणाऱ्यांमध्ये एक आरोपी पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे समजते. सोमवारी मध्यरात्रीनंतर काटोल नाका चौकात ही संतापजनक घटना घडली. यामुळे पत्रकार जगतात तीव्र रोष निर्माण झाला आहे.
सौरभ वीरेंद्रसिंग ठाकूर (वय २७, रा. कुतुबशहानगर, गिट्टीखदान) आणि संकेत अशोकराव कुहिरे (वय २६, रा. बोरगाव-गोरेवाडा) अशी आरोपींची नावे आहेत.
पत्रकार त्रिपाठी सोमवारी मध्यरात्री लोकमत कार्यालयातून नेहमीप्रमाणे कर्तव्य आटोपून दुचाकीने घराकडे निघाले. काटोल नाका चौकात काम सुरू असल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे त्रिपाठींच्या दुचाकीची गती फारच कमी होती. चौकात अचानक वेगात आलेल्या एमएच ३१/सीए ५३८३ क्रमांकाच्या कारचालकाने त्रिपाठींच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे ते दुचाकीसह खाली पडले. ते उठून उभे होणार तेवढ्यात कारचालक आरोपी सौरभ आणि संकेतने कारखाली उतरून अंधा है क्या, दिखता नहीं क्या म्हणत त्रिपाठींवर हल्ला चढवला. त्रिपाठी त्यांना समजावत असताना आरोपी सौरभ ‘मुझे पहचानता नहीं क्या’असे विचारत हातबुक्क्यांनी मारत होता. संकेत चिथावणी देत होता तर, तिसरा एक साथीदार आला आणि ‘मै भी लगावू क्या दो-चार हात’म्हणत शिवीगाळ करून आरोपींना प्रोत्साहित करू लागला. त्यामुळे आरोपी सौरभ ‘अब दिखाता हूं’ म्हणत कारमधून ‘शस्त्रासारखे काही’ काढण्यासाठी कारकडे वळला. नेमक्या वेळी पोलिसांचे गस्ती वाहन तेथून जात असल्याचे पाहून त्रिपाठी यांनी मदतीसाठी पोलिसांना आवाज दिला. पोलीस थांबल्याचे पाहून आरोपी सौरभ त्यांनाही दमदाटी करू लागला. दरम्यान, गिट्टीखदान पोलिसांचे आणखी एक पथक आणि याच मार्गावर राहणारे काही पत्रकार तेथे पोहोचले. त्यामुळे आरोपी सौरभ आणि संकेतने मारहाण, शिवीगाळ थांबविली तर त्यांचा तिसरा साथीदार पळून गेला. पोलिसांनी घटना जाणून घेण्याचे प्रयत्न केले असता आरोपी सौरभने आपला मोबाईल काढून व्हिडीओ बनवू लागला.
मेरे घरमे भी पुलिसवाले है... मै भी कानून जानता हूं... म्हणून पोलिसांना दमदाटी करू लागला. त्याचा निर्ढावलेपणा पाहून पोलीसही दडपणात आले. त्यानंतर त्यांनी त्रिपाठी तसेच दोन्ही आरोपींना सदर ठाण्यात नेले. यावेळी मंगळवारी पहाटेचे सुमारे २ वाजले होते. ठाण्यातही आरोपींची गुंडगिरी सुरूच होती. प्रत्येकाकडे ते आकसाने बघत होते.
वरिष्ठांची ठाण्यात धाव
या प्रकरणाची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने एवढ्या पहाटे अनेक पत्रकार सदर ठाण्यात पोहोचले. पत्रकारांकडून माहिती कळाल्याने नाईट राऊंडवर असलेले पोलीस उपायुक्त एस. चैतन्य हे सुद्धा ठाण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पहाटे ३.३० वाजता या घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी तसेच उपायुक्त एस. चैतन्य यांनी आवश्यक ते निर्देश दिले. यावेळी नाईट आॅफिसर पीएसआय फड यांनी त्रिपाठी यांची तक्रार घेतल्यानंतर मेडिकल करवून घेतले आणि आरोपींविरुद्ध कलम २७९, ३३७, २९४, ३२३, ३४ भादंवि तसेच मोटर वाहन कायद्याचे सहकलम १८४, १८५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
पत्रकारजगतात रोष
या घटनेमुळे पत्रकारजगतात तीव्र रोष निर्माण झाला आहे. राज्यात पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी आरोपींची जामिनावर सुटका झाली. त्यामुळे पत्रकारांमध्ये संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, पत्रकारांच्या शिष्टमंडळाने प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांची भेट घेऊन आरोपीचा गुन्हेगारी अहवाल तपासण्याची तसेच कडक कारवाईची मागणी केली. आयुक्तांनी ती मान्य करून कारवाईचे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे, वृत्तपत्रात काम करणारे अनेक पत्रकार मध्यरात्रीनंतर, दुचाकीने आपल्या घराकडे जातात. बोरगाव गोरेवाडा, काटोल रोड, फ्रेण्डस कॉलनी, झिंगाबाई टाकळी, इमामवाडा, मेडिकल, वंजारीनगर पाण्याची टाकी, अजनी पोलीस स्टेशन, हुडकेश्वर, बेसा या मार्गावर रात्री ११ नंतर समाजकंटकांचा हैदोस सुरू असतो. त्यामुळे अनेकदा लुटमारीच्या घटनाही घडतात. पत्रकारांना मारहाण करून लुटण्याचे प्रकारही वर्धा, बेसा, हुडकेश्वर अजनी मार्गावर यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या मार्गावर रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.