रागांच्या स्वरधारेने भिजले नागपूरकर

By Admin | Published: August 1, 2016 02:03 AM2016-08-01T02:03:31+5:302016-08-01T02:03:31+5:30

अतिशय सुरेल, मधाळ व भरीव फुंक हे बलस्थान असलेले पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया, जपानचे युवा संतूरवादक

Bhajle Nagpur by the melodious voice of Ragas | रागांच्या स्वरधारेने भिजले नागपूरकर

रागांच्या स्वरधारेने भिजले नागपूरकर

googlenewsNext

पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे मधाळ बासरीवादन : ताकाहिरो संतूरवादनासह कत्थक नृत्याची अनुपम अनुभूती

नागपूर : अतिशय सुरेल, मधाळ व भरीव फुंक हे बलस्थान असलेले पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया, जपानचे युवा संतूरवादक ताकाहिरो यांच्या वादनाचा स्वरविस्तार, चंद्रशेखर गांधी यांचे खुमासदार तबला वादन अशा दिग्गजांच्या वाद्यांच्या जुगलबंदीने रविवारची संध्याकाळ नागपूरकर रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली.

शब्दसुरांचे एक मधूर नाते आहे. ते कायम चैतन्यदायी आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात आयोजित डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती आंतरराष्ट्रीय संगीत समारोहात कलाकारांच्या सादरीकरणाने त्याची प्रचिती अनुभवायला मिळाली. देशपांडे सभागृहात रविवारच्या संगीत सभेत प्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, जपानचे संतुरवादक ताकाहिरो व पुण्याच्या नृत्यगुरू पं. शमा भाटे यांच्या शिष्यांनी कत्थक नृत्याचे जोरदार सादरीकरण केले. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून प्रामुख्याने खासदार कृपाल तुमाने, न्यायमूर्ती भूषण गवई, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खा. विजय दर्डा, विभागीय आयुक्त अनुप कुमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे निदेशक पीयूषकुमार उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांच्याहस्ते नागपूरचे वरिष्ठ संगीततज्ञ नारायणराव मंगरुळकर व वरिष्ठ कत्थक गुरु पं. मदन पांडे यांना सन्मानित करण्यात आले.
या संगीत सभेत प्रमुख आकर्षण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन ठरले. पंडितजींचे व्यासपीठावर आगमन होताच जिंदादिल नागपूरकरांनी प्रचंड उत्साहात टाळ्यांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादासह त्यांचे स्वागत केले. राग भूपाळीसह त्यांनी आपल्या बासरी वादनाला सुरुवात केली. पंडितजींचे श्वासावरील विलक्षण नियंत्रण, कायम आस पाझरणारा मधाळ स्वरबंध, वादनातील माधुर्य उपस्थित रसिक श्रोत्यांनी तनमनात जपून ठेवले. यावेळी त्यांना तबल्यावर साथसंगत करणारे पद्मश्री विजय घाटे व पखवाजवर भवानीशंकर यांच्यामुळे हे वादन अधिकच रंगत गेले. विशेष म्हणजे यावेळी पंडितजींनी नागपूरचे प्रतिभावान बासरी निर्माता मुकुंद लेकुरवाळे यांनी तयार केलेल्या बासरीसह वादन केले. श्रावणात आभाळात दाटून आलेले निळेसावळे मेघ, पाऊसधारांचे थंडगार शिडकावे व पंडितजींची पहाडी रागातील रोमांचक अनुभूती यासह अवघे सभागृह अनोख्या स्वरधारांमध्ये भिजून गेले.
काश्मीरच्या लोकसंगीतातील वाद्याला शास्त्रीय रागसंगीतात मानाचे स्थान प्राप्त करून देणारे विश्वविख्यात कलाकार पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य जपानचे ताकाहिरो अराई व प्रसिद्ध तबलावादक चंद्रशेखर गांधी यांची जुगलबंदी अनोखी ठरली. ताकाहिरो यांनी राग यमनने आपल्या वादनाला सुरुवात केली. यानंतर विलबिंत, रुपक व त्रिताल त्यांनी वाजविले. चंद्रशेखर गांधी यांच्या खुमासदार तबला वादनाने उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटासह कलावंतांना भरभरून दाद दिली.
संगीत सभेच्या शेवटच्या टप्प्यात कत्थकगुरू पुण्याच्या शमा भाटे यांच्या मार्गदर्शनात आठ शिष्यांनी बेले शैलीत सामूहिक नृत्य सादर केले. सुबक हावभाव, लयकारीच्या आवर्तनात भिजलेल्या घुंगरांचे व भिंगरीच्या गतीने फिरणारे कलात्मक नृत्याने रसिकांना मोहून घेतले. त्यांचे नृत्य पं. वसंतराव देशपांडे यांच्या बंदिशीवर आधारित होते. नृत्याचे हे नेत्रसुखद सादरीकरण अमीरा पाटणकर, अवनी गद्रे, सावनी मोहिते, शिवानी करमरकर, केतकी साठे, नुपुर अत्रे, आर्या शेंदुर्णीकर यांनी केले. त्यांना वाद्यांवर चिन्मय कोल्हटकर, चारुदत्त फडके, प्रसाद रहाणे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.(प्रतिनिधी)

 

Web Title: Bhajle Nagpur by the melodious voice of Ragas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.