पर्स चोरून पळून जाणारे भामटे काही तासातच जेरबंद
By नरेश डोंगरे | Published: September 14, 2023 09:39 PM2023-09-14T21:39:57+5:302023-09-14T21:40:10+5:30
नागपूर : रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीची पर्स चोरून पळून जाणाऱ्या दोन भामट्यांना रेल्वे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ...
नागपूर : रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीची पर्स चोरून पळून जाणाऱ्या दोन भामट्यांना रेल्वे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासातच जेरबंद केले. पुरकान नासिर मोहम्मद साबिर (वय ३४, रा. हफिज बेकरीजवळ मोमिनपुरा) आणि अविनाश उर्फ साहिल मनोज समुंद्रे (वय २२, रा. भक्त सागर नगर, नारी) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत.
बुधवारी रेल्वे स्थानकावर एक प्रवासी झोपेत असताना या प्रवाशाची पर्स या दोन भामट्यांनी लंपास केली. त्या प्रवाशाने रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकानेही समांतर चाैकशी सुरू केली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी रेल्वे स्थानकाच्या ईटारसी मार्गावरील टोकाकडे जाताना दिसले. पोलिसांनी तिकडे धाव घेऊन आरोपींना जेरबंद केले.
चाैकशीत त्यांनी आपली नावे पुरकान आणि अविनाश उर्फ साहिल सांगितली. त्यांनी चोरीची कबुली देऊन चोरलेल्या पर्समधील ३६०० रुपये पोलिसांच्या हवाली केले. अधिक चाैकशीत या दोघांनी आणखी एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. एलसीबीचे निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, सहायक उपनिरीक्षक सुरेश राचलवार, हवलदार श्रीकांत धोटे, अंमलदार चंद्रशेखर मदनकर, राहुल यावले, पंकज बांते यांनी ही कामगिरी बजावली.