रामनामाच्या गजरात नागपुरात शनिवारी भव्यदिव्य शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:28 PM2019-04-12T22:28:17+5:302019-04-12T22:29:28+5:30
राम जन्मोत्सवानिमित्त श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचे संपूर्ण भारतभरात आकर्षण असते. यंदाचे शोभायात्रेचे ५३ वे वर्ष असून, यात ७९ चित्ररथांचा समावेश असणार आहे. या शोभायात्रेसाठी अख्खी नागपूर नगरी भगव्याने सजली असून, यानिमित्त नागपूरला अयोध्येची छटा लाभली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राम जन्मोत्सवानिमित्त श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचे संपूर्ण भारतभरात आकर्षण असते. यंदाचे शोभायात्रेचे ५३ वे वर्ष असून, यात ७९ चित्ररथांचा समावेश असणार आहे. या शोभायात्रेसाठी अख्खी नागपूर नगरी भगव्याने सजली असून, यानिमित्त नागपूरला अयोध्येची छटा लाभली आहे.
अयोध्येच्या सजावटीप्रमाणे सुवर्ण रंगाने मढविलेल्या आकर्षक रथावर भगवान राम, माता जानकी लक्ष्मणासह विराजमान असतील. यामध्ये महालक्ष्मीसह श्रीयंत्र दर्शनाचा लाभ भाविक घेऊ शकतील. शोभायात्रेपूर्वी मंदिरात सकाळी ४ वाजता उत्थापन, मंगल आरती, अभिषेक आणि अभ्यंगस्नान केले जाईल. सकाळी ९ वाजता श्रीरामकृष्ण मठ संकीर्तन मंडळाद्वारे ‘श्रीराम संकीर्तनम्’ आणि प्रसिद्ध गायकांद्वारे महामंत्राचे संकीर्तन होईल. दुपारी १२ वाजता अभिषेक, षोडशोपचार पूजन, मंगलवाद्य ध्वनी, शहनाई वादन, शंखनाद, भेरी नादाच्या गगनभेदी आवाजासह भगवान रामाचा जन्मोत्सव साजरा केला जाईल.
आरती व प्रार्थनेनंतर प्रसाद वितरण केले जाईल. यानंतर भगवंताला ताराचंद अग्रवाल यांच्यातर्फे नवीन पोशाख अर्पण केली जाईल. अशोककुमार, भरतकुमार करवा यांच्यावतीने मुकुट शृंगार केले जाईल. यावेळी बजेरिया महिला समाजातर्फे श्रीराम जन्माचे स्वागत करणारी गीते गायली जाणार आहेत. सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते भगवंताच्या रथाचे पूजन केले जाईल. भगवान राम यांच्या पुनरागमनानंतर अयोध्येत दिवाळी साजरी झाली होती. अगदी तसेच दृश्य असलेल्या स्वर्ण शुभ दीपावली रथावर श्रीराम, जानकी व हनुमानजी यांना वैदिक मंत्रासह विराजित करण्यात येईल.
पश्चिम नागपुरातही गुंजणार राम नामाचा गजर
पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने रामनगरातील राम मंदिरातून सायंकाळी ५ वाजता शोभायात्रा निघणार आहे. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याहस्ते पूजन करण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, माजी खासदार अजय संचेती, आमदार सुधाकर कोहळे व अनिल सोले उपस्थित राहतील. या शोभायात्रेत ३५ चित्ररथ राहणार आहे. शोभायात्रेचे हे ४६ वे वर्ष असून, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ४ राज्यातील प्रसिद्ध नृत्याचे सादरीकरण होणार आहे.
लकडगंज येथून निघणार रामधून
लकडगंज रामजन्मोत्सव समितीच्यावतीने लकडगंज उद्यानाजवळील श्री कालिमाता मंदिरातून सकाळी ८ वाजता रामधून निघणार आहे. यात बॅण्ड पथक, पथध्वज, धर्मध्वजासह विविध चित्ररथांचा समावेश राहणार आहे. रामधूनच्या समापनानंतर दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव साजरा होणार आहे.
वाडीतही रामजन्मोत्सव साजरा
वाडीमध्ये श्रीराम जन्मोत्सव समितीद्वारे सायंकाळी ६ वाजता शोभायात्रा निघणार आहे. दत्तवाडीच्या नाका नंबर १० येथून शोभायात्रेला सुरूवात होईल. जागोजागी शोभायात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. ढोल ताशा पथकासह फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा राहणार आहे. शोभायात्रेत विविध चित्ररथांचा समावेश राहणार आहे.
येथेही होणार आयोजन
लाकडीपूल येथील श्री गजानन महाराज मंदिरात संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. पं. गणेश शास्त्री यांच्या उपस्थितीत रामजन्मोत्सव साजरा होईल. सतरंजीपुरा येथील राममंदिर पंचकमिटीच्यावतीने रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम होईल. तसेच ह.भ.प. महेश नंदरधने महाराजांचे कीर्तनसुद्धा आयोजित करण्यात आले आहे. हरिहर मंदिर लकडगंज येथे रामजन्मोत्सवानिमित्त ह.भ.प. अशोकराव लांबट महाराजांचे कीर्तन होईल. दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव साजरा करण्यात येईल. गोरक्षण सभेच्यावतीने धंतोली येथील गोपालकृष्ण मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात येईल. सकाळी १० वाजता ह.भ.प. जिजाबाई बानाईत यांचे रामजन्मोत्सवाचे कीर्तन होईल. श्री आग्याराम देवी मंदिर ट्रस्टच्यावतीने चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त दुपारी ३ वाजता ज्योती विसर्जन कार्यक्रम होईल. नरेंद्रनगरातील वीर हनुमान मंदिरात सकाळी १० वाजता ह.भ.प. मृदूला कोल्लारकर यांचे कीर्तन होणार आहे. सेंट्रल एक्साईज लेआऊट खामला येथील श्रीराम मंदिरात सकाळी ८ वाजता अभिषेक, १० वाजता ह.भ.प. आशिष भालेराव यांचे कीर्तन व सायंकाळी ६.३० वाजता भजन व आरती होणार आहे. सुरेंद्रनगर येथील राधाकृष्ण मंदिरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त दुपारी १२ वाजता महाआरती होणार आहे. रामदासपेठेतील मारुती देवस्थान ट्रस्टतर्फे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन सकाळी १०.३० वाजता होईल. श्री अयोध्यावासी वैश्य नगर सभेतर्फे सकाळी ८ वाजता लालगंज हनुमान मंदिरातून शोभायात्रा निघणार आहे. सारंग कल्चरल फाऊंडेशनतर्फे आयोजित भोसला राजघराण्याची ऐतिहासिक शोभायात्रा दुपारी ४ वाजता सिनियर भोसला पॅलेस, महाल येथून निघणार आहे. कलासंगम तर्फे रेशीमबाग येथील उद्यानात सकाळी ६ वाजता गीत रामायण होणार आहे. श्री सद्गुरू सिद्धारूढ अध्यात्म समितीतर्फे सकाळी ८ वाजता रुद्राभिषेक होणार आहे. टिळक पुतळा, महाल येथील श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सवानिमित्त सकाळी १० वाजता ह.भ.प. मृण्मयी कुळकर्णी यांचे कीर्तन होईल. दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव सोहळा संपन्न होईल. महालातील रुईकर रोडवरील श्री साधू गोपाळकृष्ण मंदिरात सकाळी १० वाजता प्रा. रवींद्र साधू यांचे कीर्तन होईल. विवेकानंदनगर, वर्धा रोड येथील श्रीराम मंदिरात ह.भ.प. श्रीधरबुवा खोंड यांचे सकाळी १० वाजता कीर्तन होईल. सायंकाळी ६.३० वाजता शोभायात्रा निघेल. गिरीपेठ येथील श्रीराम व हनुमान मंदिरात रामजन्मोत्सवानिमित्त सकाळी १०.३० वाजता नीता परांजपे यांचे रामजन्मावर कीर्तन होईल.