भंडारा जिल्हा रुग्णालयाचा फायर ऑडिटकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:07 AM2021-01-10T04:07:18+5:302021-01-10T04:07:18+5:30
जिल्हा रुग्णालयाला साधारण २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रोज ८००वर रुग्ण येतात. आंतररुग्ण विभागात ...
जिल्हा रुग्णालयाला साधारण २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रोज ८००वर रुग्ण येतात. आंतररुग्ण विभागात (आयपीडी) ४८२ खाटा आहेत. मोठ्या रुग्णांसाठी ६ खाटांचे अतिदक्षता विभाग, तर लहान मुलांसाठी २५ खाटांचे विशेष नवजात अतिदक्षता विभाग (एसएनआयसीयू) आहे. नियमानुसार शासकीय रुग्णालयाचे दर तीन वर्षांनी फायर ऑडिट करण्याचा नियम आहे. परंतु, याला वरिष्ठांनी गंभीरतेने घेतले नसल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी २२ सप्टेंबर २०२० रोजी रुग्णालयातील संभावित धोका टाळण्यासाठी रुग्णालयातील अग्निप्रतिबंधक यंत्राची सविस्तर तपासणी करून अहवाल सादर करण्याचे पत्र भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांना दिले होते. त्याची एक प्रत आरोग्य सेवा संचालनालयाचे सहसंचालक, आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक यांनाही देण्यात आले होते. याच्या पाच दिवसांनंतर २८ सप्टेंबर रोजी डॉ. खंडाते यांनी ‘नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज’, सिव्हिल लाइन्स नागपूरचे संचालक यांनाही पत्र देऊन ‘फायर ऑडिट’चा प्रस्ताव दिला. परंतु, कोणीच यासाठी पुढाकार घेतला नाही. ही घटना शॉर्टसर्किटमुळे झाली की इन्क्युबेटर जळाल्याने झाली, याचे वास्तव तपासातून सामोर येईल. मात्र, वेळीच जर फायर ऑडिट होऊन उपाययोजना झाल्या असत्या तर १० चिमुकल्यांचे प्राण वाचले असते, असे बोलले जात आहे.
-व्हीएनआयटी व नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजकडून तपासणी
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या रुग्णालयाला भेट देऊन घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी ‘व्हीएनआयटी’कडून इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट तर ‘नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज’कडून ‘फायर ऑडिट’ करण्याच्या सूचना दिल्याचीही माहिती दिली.