भंडारा, हिंगणघाट व नागपूरची घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी लक्ष घालणार : रुपाली चाकणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2022 04:25 PM2022-08-08T16:25:20+5:302022-08-08T16:42:09+5:30
नागपूरच्या मेडिकलला भेट देऊन दोन्ही पीडितेचा प्रकृतीची चौकशी
सुमेध वाघमारे
नागपूर : भंडारा येथील ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, हिंगणघाट येथील १३वर्षीय मुलीवर खासगी आश्रम शाळेतील अधीक्षकाने चाकूच्या धाकावर केलेला अत्याचार व नागपूर कामगारनगर येथील ५ वर्षीय चिमुलीला जन्मदात्या आई-वडिलांनी बेदम मारहाण करून मारुन टाकल्याची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पीडितेला तातडीने न्याय मिळण्यासाठी या तिन्ही घटना ‘फास्ट ट्रॅक कोर्टात’ चालविण्यासाठी लक्ष घालणार, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ३५ वर्षीय महिला व १३ वर्षीय मुलीवर उपचार सुरू आहेत. सोमवारी चाकणकर यांनी या दोन्ही पीडितांना भेटून प्रकृतीची चौकशी केली. चाकणकर म्हणाल्या, ३५ वर्षीय पीडिता बोलण्याचा स्थितीत नाही. यामुळे तिसरा आरोपी अद्यापही मोकाट आहे. १३ वर्षीय मुलगी अद्यापही ‘शॉक’मध्ये आहे. अधीक्षकाला अटक करण्यात आली आहे. तर ५ वर्षीय चिमुकलीच्या हत्या प्रकरणात आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही घटनाबाबत राज्य महिला आयोग सुमोटो तक्रार दाखल करणार आहे. लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी खटला ‘फास्ट ट्रॅक कोर्टात’ चालविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.