भांडेवाडीतील आग दुसऱ्या दिवशीही कायम
By admin | Published: March 23, 2017 02:23 AM2017-03-23T02:23:58+5:302017-03-23T02:23:58+5:30
भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डला मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास लागलेली आग रात्री उशिरा नियंत्रणात आली होती.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात : आग विझवण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न
नागपूर : भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डला मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास लागलेली आग रात्री उशिरा नियंत्रणात आली होती. परंतु कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून धूर निघतच होता. त्यामुळे अग्निशमन विभागाचे जवान रात्रभर ढिगाऱ्यांवर पाण्याचा मारा करीत होते. बुधवारी सकाळी आग आटोक्यात आली होती. परंतु दुपारी ४ च्या सुमारास पुन्हा आग भडकली. याची माहिती मिळाल्यानंतर थोड्याच वेळात तीन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. रात्री उशिरा आग आटोक्यात आली होती. परंतु कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून धूर निघत असल्याने पाण्याचा मारा सुरू ठेवण्यात आला होता.
मंगळवारी अग्निशमन विभागाच्या कळमना व लकडगंज,कॉटनमार्केट, सुगतनगर व सक्करदरा या केंद्रावरील आठ गाड्या बोलावण्यात आल्या. अशाप्रकारे आठ गाड्यांनी पाण्यासाठी ६० फेऱ्या करून आग आटोक्यात आणली होती. बुधवारी पुन्हा कळमना लकडगंज व कॉटनमार्केट या केंद्रावरील गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी पाठविण्यात आल्या. रात्री उशिरा आग आटोक्यात आली. परंतु कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून धूर निघणे सुरू असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.
भांडेवाडी येथील कचऱ्यावर विन्ड्रो प्रक्रिया सुरू आहे. यात साठविलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांना चर फाडून कचरा वाळवून त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रि या गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. यामुळे येथील दुर्गंधी कमी झाली आहे. परंतु डम्पिंग यार्डमधील कचरा वाळलेला असल्याने आगीचा भडाका उडाला. यामुळे पथकाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु डम्पिंग यार्डलगतची संरक्षण भिंत पडलेली आहे. या ठिकाणाहून शौचासाठी आलेल्या एखाद्या व्यक्तीने पेटती विडी वा सिगारेट टाकल्याने ही आग लागली असावी अशा अंदाज आहे. (प्रतिनिधी)
धुरामुळे आरोग्याला धोका
डम्पिंग यार्डला गेल्या ३६ तासांपासून लागलेल्या आगीमुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून प्रचंड धूर निघत आहे. यामुळे लगतच्या वस्त्यातील नागरिकांच्या आरोग्याला धुरामुळे धोका निर्माण झाला आहे. डम्पिंग यार्डलगतच्या अर्धा ते एक किलोमीटर परिसरात धूर पसरला होता. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते.