नागपुरात प्रथमच रंगणार भारत रंग महोत्सव :अमेरिका, रशियाची नाटके होणार सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 08:18 PM2020-02-05T20:18:38+5:302020-02-05T22:35:35+5:30
देशातील सर्वात मोठी नाट्य प्रशिक्षण संस्था ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)’च्या वतीने नागपुरात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात असलेल्या ‘भारत रंग महोत्सवा’च्या एका सत्राचे आयोजन केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील सर्वात मोठी नाट्य प्रशिक्षण संस्था ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)’च्या वतीने नागपुरात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात असलेल्या ‘भारत रंग महोत्सवा’च्या एका सत्राचे आयोजन केले जात आहे. ९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव शंकरनगर येथील साई सभागृहात पार पडणार आहे.
जगभरात रंगकर्मींमध्ये या महोत्सवाविषयी प्रचंड आकर्षण असते. हा महोत्सव ‘भारंगम’ या नावाने सर्वपरिचित आहे. आयोजनाचे हे २१वे वर्ष असून, यंदा हा महोत्सव ४५ दिवसांचा असणार आहे. त्यातील सात दिवसांचे यजमानपद नागपूरला मिळाले आहे. एनएसडीच्या रेपरटरी गॅ्रण्ट (अनुदान) समितीचे तज्ज्ञ सदस्य म्हणून नेमणूक झालेले डॉ. विनोद इंदूरकर यांच्या प्रयत्नामुळे नागपूरकर रंगकर्मी व रंगरसिकांना या महोत्सवाचा रसास्वाद घेता येणार आहे.
९ फेब्रुवारी रोजी उद्घाटन झाल्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत देश-विदेशातील सात नाटके या महोत्सवात सादर होणार आहेत. यात मुंबई येथून ‘एक झुंज वाऱ्याशी’, कोलकाता येथून ‘लहरिर राजहंसो’, अहमदाबाद येथून ‘काला याने अंधेरा’, अमेरिकेतून ‘लाईव्ह न्युक्स’, कोलकाता येथून ‘गीत गोबिंदो’, रशिया येथून ‘ज्द्रिबिना : दी वरिसर वूमन’ आणि पणजी येथून ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकांचा समावेश आहे. या महोत्सवाच्या तयारीसाठी नागपुरात एनएसडीची संपूर्ण चमू दाखल झाली असून, या महोत्सवात दररोज नागपूरकर कलावंतांचेही सादरीकरण असणार आहे.
सेट, प्रकाशयोजना नागपूरचीच
या महोत्सवासाठी संपूर्ण प्रारूप एनएसडीकडून प्राप्त झाले असून, रंगमंच सजावट, नाटकाची सेट डिजाईन, प्रकाशयोजना आदी सर्व नागपूरकरांच्याच हाती असणार आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय कलावंतांशी स्थानिक कलावंतांचा संवाद हा महत्त्वाचा बिंदू या नाट्यमहोत्सवातून साधला जाणार आहे.
अतिशय महत्त्वाची घडामोड - बापू चनाखेकर
हा अतिशय महत्त्वाचा योग जुळून आला असून, अत्यंत महत्त्वाची घडामोड या महोत्सवाद्वारे नागपुरात होत असल्याची आर्त भावना ज्येष्ठ रंगकर्मी व आयोजन सदस्यांमध्ये प्रमुख भूमिकेत असलेले बापूकाका उपाख्य अनिल चनाखेकर यांनी व्यक्त केली.
नागपूरकर ‘एनएसडीयन’ उत्साहात
या महोत्सवाच्या निमित्ताने एनएसडीचे माजी विद्यार्थी असलेले पीयूष धुमकेकर, संगीता टिपले यांना खास व्यवस्थेत सामील करण्यात आले आहेत. सोबतच अन्य नागपूरकर एनएसडीयन्सही या महोत्सवात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. नेपथ्याची संपूर्ण व्यवस्था स्वप्निल बोहटे व प्रकाशयोजनेची संपूर्ण व्यवस्था किशोर बत्तासे तर अन्य तांत्रिक व्यवस्थेसाठी रूपेश पवार या नागपूरकर युवा रंगकर्मींना जबाबदारी देण्यात आली आहे. एवढा मोठा महोत्सव प्रथमच नागपुरात होत असल्याने हे सर्व रंगकर्मी प्रचंड उत्साहात आहेत.