भूमिपुत्र राजदीप ‘नेट’ मध्ये देशातून दुसरा

By admin | Published: March 31, 2015 02:18 AM2015-03-31T02:18:10+5:302015-03-31T02:18:10+5:30

समाजात काही माणसे अशी असतात की ज्यांना शून्यातून स्वत:चे अस्तित्व घडवावे लागते. परिस्थिती कितीही

Bharatiputra Rajdeep is the second in the 'Net' country | भूमिपुत्र राजदीप ‘नेट’ मध्ये देशातून दुसरा

भूमिपुत्र राजदीप ‘नेट’ मध्ये देशातून दुसरा

Next

‘एमस्सी’मध्ये घेतले होते चार सुवर्णपदक : खडतर परिस्थितीवर केली मात
नागपूर :
समाजात काही माणसे अशी असतात की ज्यांना शून्यातून स्वत:चे अस्तित्व घडवावे लागते. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी परिश्रमानेच यश मिळते हे यशाचे सूत्र ठेवून ते जेव्हा मार्गक्रमण करतात तेव्हा त्यांच्या डोळ््यातील स्वप्ने आणखी मोठी होतात. अखेर त्याच्या कर्तृत्वानेच त्याची जगाला ओळख होते. जमिनीशी प्रेमळ संवाद साधणाऱ्या एका शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या राजदीप देवीदास उताणे याने हीच गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. खेडेगावातून आलेल्या राजदीपने ‘सीएसआयआर-यूजीसी’तर्फे (कॉन्सिल आॅफ सायन्टिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीअल रिसर्च-युनिव्हर्सिटी ग्रॅन्ड कमिशन) आयोजित ‘नेट’च्या परीक्षेत देशपातळीवर दुसरे स्थान पटकाविले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०१ व्या दीक्षांत समारंभातदेखील त्याने चार सुवर्णपदके पटकावली होती हे विशेष. आपल्या कर्तृत्वाने त्याने हजारो विद्यार्थ्यांसमोर प्रेरणा निर्माण केली आहे.‘सीएसआयआर-युजीसी’तर्फे डिसेंबर २०१४ मध्ये प्राध्यापकपदाच्या पात्रतेसाठी ‘नेट’ची परीक्षा घेण्यात आली होती. यात राजदीप केवळ उत्तीर्णच झाला नाही तर त्याने देशपातळीवर दुसरा क्रमांक मिळविण्यात यश मिळविले.
खेड्यातून सुरू झाला प्रवास
शासकीय विज्ञान संस्थेतून रसायनशास्त्र विषयात ‘एमएसस्सी’ करणाऱ्या राजदीपचे वडील हे शेतकरी असून यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत तालुक्यातील आजंती येथे त्यांची शेती आहे. घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने राजदीपला सुरुवातीपासूनच संघर्षाचा सामना करावा लागला. पदव्युत्तर शिक्षणासाठी राजदीपने नागपूर गाठले व शासकीय विज्ञान संस्थेत प्रवेश मिळवला. संस्थेच्या वसतीगृहात शिकत असताना दिवसातून दहा ते बारा तास अभ्यास करून त्याने ‘एमएस्सी’ रसायनशास्त्रासारख्या अवघड विषयाच्या परीक्षेत विद्यापीठातून सर्वात जास्त गुण प्राप्त केले़ फेब्रुवारी महिन्यात झालेल्या १०१ व्या दीक्षांत समारंभात त्याचा चार सुवर्णपदकांनी सन्मान करण्यात आला. राजदीप सध्या रसायनशास्त्रातच संशोधन करत आहे. प्रा. डॉ. सुजाता देव यांच्या मार्गदर्शनात ‘अ‍ॅन्टी कॅन्सर ड्रग’ व ‘अ‍ॅन्टी एचआयव्ही ड्रग’ या विषयावर त्याचे संशोधन सुरू आहे. (प्रतिनिधी)

भाऊ ठरला आधारस्तंभ
राजदीपच्या या यशात त्याचा भाऊ अमरदीप याचा मोलाचा वाटा आहे. उच्च शिक्षणासाठी नागपुरात येण्याची राजदीपची इच्छा होती परंतु परिस्थितीअभावी हे अशक्य होते. मोठ्या शहरात राहण्याचा खर्च आपल्याला झेपणारा नाही हे त्याला माहीत होते़ आपल्या भावाची हुशारी पाहून अमरदीपने त्याच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला व आॅटो चालवून त्याच्या शिक्षणासाठी पैसा पुरविला. रसायनशास्त्रातील ‘बेसिक’ चांगले असल्यामुळे ‘नेट’साठी मी स्वअभ्यासावरच भर दिला. शिवाय डॉ.सुजाता देव व डॉ.फरहीन इनाम खान या शिक्षकांचेदेखील चांगले सहकार्य लाभले. माझे संशोधनकार्य पुढेदेखील सुरूच राहिल असे मत राजदीपने यावेळी व्यक्त केले.

Web Title: Bharatiputra Rajdeep is the second in the 'Net' country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.