भाजपा-संघाचा गांधी जयंतीचा निव्वळ फार्स; अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:07 AM2018-10-01T10:07:48+5:302018-10-01T10:08:19+5:30
भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वच्छता अभियानाच्या नावाखाली महात्मा गांधी यांचे नाव घेत असले तरी, त्यांचा गांधीजींच्या विचारांशी कोणताही संबंध नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वच्छता अभियानाच्या नावाखाली महात्मा गांधी यांचे नाव घेत असले तरी, त्यांचा गांधीजींच्या विचारांशी कोणताही संबंध नाही. आधी त्यांनी स्वत:च्या मनाची स्वच्छता करावी. ते गांधीजींच्या विचारांशी एकसंघ होऊ च शकत नाहीत. भाजपा-संघाचा गांधी जयंतीचा निव्वळ फार्स असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केला.
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून सेवाग्राम येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक व पदयात्राचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित आढावा बैठकीनंतर अशोक चव्हाण पत्रकारांशी बोलत होते.
महात्मा गांधी यांची सर्वधर्मसमभावाची भूमिका भाजपा स्वीकारणार आहे का, असा सवाल करून भाजपा मतासाठी औपचारिकता म्हणून गांधीजींचे नाव घेत असल्याचा हल्लाबोल अशोक चव्हाण यांनी केला. मात्र काँग्रेस हा महात्मा गांधी यांचे विचार व संविधानावर चालणारा पक्ष आहे. काँगे्रसचा कार्यकर्ता त्यांच्या विचाराशी समरस झालेला आहे.
गांधीजी यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. १५० वी गांधी जयंती हा ऐतिहासिक दिवस आहे. यानिमित्ताने वर्षभर संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सेवाग्राम येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची ऐतिहासिक बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली
विदर्भ काँगे्रसच्या पाठीशी
विदर्भाने काँग्रेसला नेहमीच साथ दिली आहे. काँग्रेसची सत्ता स्थापण्यात मोठे योगदान राहिलेले आहे. याहीवेळी विदर्भाची साथ काँग्रेसला मिळण्याची अपेक्षा आहे. पक्षपातळीवर जोमाने काम करण्याची गरज आहे. नुक त्याच पार पडलेल्या नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. ग्रामीण भागात बदलाचे वारे वाहू लागले आहे. यातून काँग्रेसला बळ मिळणार असल्याचा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
सेवाग्राम येथील कार्यक्रमाची जय्यत तयारी
महात्मा गांधी यांच्या जयंतीला सेवाग्राम येथे आयोजित काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक व पदयात्रेच्या कार्यक्रमाची पक्षातर्फे जय्यत तयारी सुरू आहे. ही ऐतिहासिक बैठक व पदयात्रा असल्याने तालुका व जिल्हा स्तरावर कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे. यात विदर्भासह राज्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.