फ्रान्सच्या अॅनिक चेमोट्टी यांनी नागपुरात सादर केले भरतनाट्यम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:05 AM2018-11-29T11:05:33+5:302018-11-29T11:06:09+5:30
मूळच्या फ्रान्सच्या रहिवासी असलेल्या अॅनिक चेमोट्टी ऊर्फ देवयानी या पूर्णपणे भारतीय रंगात रंगल्या आहेत.
निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय परंपरागत शास्त्रीय संगीत, पुढे नृत्य सादरीकरणासाठी भारतीय नाव आणि भारतीयत्व आत्मसात केलेल्या भरतनाट्यम नृत्यांगना म्हणजे देवयानी. मूळच्या फ्रान्सच्या रहिवासी असलेल्या अॅनिक चेमोट्टी ऊर्फ देवयानी या पूर्णपणे भारतीय रंगात रंगल्या आहेत. भरतनाट्यमच्या माध्यमातून राष्टष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकीर्त झालेल्या व भारत सरकारद्वारे पद्मश्री उपाधीने सन्मानित देवयांनी यांनी जगभरात भरतनाट्यमचा प्रचार व प्रसार करण्याचे ध्येय व्यक्त करीत, भारतात नृत्याच्या सेवेत वाहिलेल्या ४५ वर्षांचा प्रवास उलगडला.
बालपणी एका चित्रपटात भारतीय माणूस आणि दुसऱ्यात भरतनाट्यम नृत्याचे छोटेसे दृश्य पाहून या देशाबद्दल आकर्षण व उत्सुकता निर्माण झाली. नृत्य प्रशिक्षणासाठी जात असताना भरतनाट्यम नृत्य शिकविण्याची जाहिरात असलेले पोस्टर पाहिले आणि त्यात सामील झाले. तेव्हा ती १० वर्षांची होती. पुढे हेच भरतनाट्यम त्यांचे जीवन झाले. २० वर्षांची असताना आईचे निधन झाले. त्यानंतर उदास झालेल्या अॅनिकने या नृत्यात आनंद शोधला. आयसीसीआरची इंडो-फ्रेंच स्कॉलरशिप प्राप्त करीत त्यांचे भरतनाट्यम शिकण्यासाठी भारतात आगमन झाले. त्यांनी चेन्नई येथे गुरू ईलप्पा मुदलियार यांच्याकडून तालीम सुरू केली. विदेशाची निवासी असूनही गुरुशिष्य परंपरेचे पालन करीत समर्पण भावनेतून त्यांनी कठोर परिश्रमातून हे यश मिळविले.
पुढे भारतात आणि भारताबाहेरही त्यांनी त्यांचे कलेचे सादरीकरण केले. यानंतर अनेक विदेशी मंचावर त्यांची प्रतिभा सादर होत राहिली आणि बहरत राहिली. प्रत्येक वेळी प्रेक्षक सुरुवातीला विस्मयित व्हायची व नंतर दाद मिळायची. २०० पासून ८० हजार प्रेक्षक असलेल्या ठिकाणी सादरीकरण केले. प्रेक्षकांना भरतनाट्यम समजो अगर न समजो, केवळ त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केल्याचे त्या म्हणाल्या. विदेशी असल्याने अनेक सहकलावंत जळायचे. मात्र प्रेम करणारे व प्रोत्साहन देणारेही भरपूर मिळाले. माझ्यातील समर्पण, परिश्रम घेण्याची तयारी आणि भारतीय माणसांकडून मिळालेले प्रेम यामुळे हा यशाचा पल्ला गाठू शकल्याचे त्या आदराने सांगतात. आईने माझे यश पाहिले नाही. मात्र एका तेलगू चित्रपटात अभिनय करताना पाहून वडिलांना भरपूर आनंद झाल्याचे त्या सांगतात. भारताकडून खूप काही मिळाल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
दोन दिवसांपूर्वी दरोडेखोरांनी लुटले
दिल्लीमध्ये दोनच दिवसांपूर्वी अघटित घटना त्यांच्यासोबत घडली. लुटारूंनी बंदुकीच्या धाकावर त्यांचे सर्व सामान लुटून नेले. पासपोर्ट, व्हिजा, सर्व महत्त्वाचे कार्ड आणि कपडे, मोबाईल असलेली बॅग लुटली गेली. या घटनेने त्यांची मानसिकता ढासळली होती. नागपूरला सादरीकरण करावे की नाही, अशा विवंचनेत त्या आणि सहकारी कलावंत होते. मात्र म्हणतात ना ‘शो मस्ट गो आॅन’. या उक्तीप्रमाणे या मानसिकतेतही त्यांनी सादरीकरणाची तयारी केली. त्यांच्यासोबत घडलेला आघात नृत्यातून त्यांनी दिसू दिला नाही.