‘भारिप’चा राष्ट्रवादीला पाठिंब्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:09 PM2018-05-07T22:09:53+5:302018-05-07T22:10:13+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारिप-बहुजन महासंघाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारास पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. केवळ नाना पटोले उमेदवार असतील तरच समर्थन देण्यात येईल, अन्यथा पक्षाकडून स्वत:चा उमेदवार उतरविण्यात येईल, असे भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पत्रपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारिप-बहुजन महासंघाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारास पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. केवळ नाना पटोले उमेदवार असतील तरच समर्थन देण्यात येईल, अन्यथा पक्षाकडून स्वत:चा उमेदवार उतरविण्यात येईल, असे भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पत्रपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. भारिपच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीसमोर निवडणुकीमध्ये आव्हान वाढण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या हुकू मशाहीला आणि चुकीच्या धोरणाला कंटाळून नाना पटोले यांनी पक्षाचा राजीनामा दिला व काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने या जागेची उमेदवारी नाना पटोले यांनाच मिळणे अपेक्षित होते. मात्र काँग्रेसने पटोले यांचा हक्क डावलून ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली आहे. हा पटोले यांच्यावर अन्याय असल्याचा आरोप सोनोने यांनी यावेळी केला. पटोले हे भारिप बहुजन महासंघाच्या विचाराचे आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली तरच पक्षातर्फे त्यांना समर्थन देण्यात येईल. इतर कुठल्याही उमेदवाराला समर्थन देण्यात येणार नाही, असे सोनोने यांनी सांगितले. पत्रपरिषदेत महासंघाचे प्रदेश महासचिव अमित भुईगळ, कुशल मेश्राम, युसूफ पुंजानी, हरिभाऊ भदे, राजू लोखंडे, गुणवंत देवपारे, रमेश पाटील, पुरुषोत्तम डाकफोडे, दामोधर साव आदी उपस्थित होते.
पटोलेंनी अपक्ष लढावे
नाना पटोले यांची उमेदवारी डावलल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज आहेत. पटोले यांनी भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, जर असे करण्यास अडचण असेल तर अपक्ष शर्यतीत उतरावे. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे अशोक सोनोने यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकरांनी लढवावी पोटनिवडणूक : लोखंडे
एकीकडे भारिप बहुजन महासंघातर्फे नाना पटोले यांना समर्थन देण्याची भूमिका जाहीर करण्यात आली असताना ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ.भाऊ लोखंडे यांनी मात्र अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवावी, असे आग्रही प्रतिपादन केले आहे. १९५४ च्या निवडणुकीत काँग्रेसने षडयंत्र रचून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला होता. हा काँग्रेसवर लागलेला कलंक आहे. हा डाग धुवायचा असेल तर त्यांनी प्रकाश आंबेडकर किंवा त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला जाहीर समर्थन करावे. काँग्रेसने पाप केले असा आरोप करणाऱ्या भाजपालाही ही चांगली संधी आहे. भाजपाने रिपब्लिकन उमेदवाराचे समर्थन करून काँग्रेसला धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी केले.