रुग्णसेवेला समर्पित व्यक्तिमत्त्व भारती बत्रा

By admin | Published: September 19, 2016 02:43 AM2016-09-19T02:43:25+5:302016-09-19T02:43:25+5:30

डॉ. भारती सुरेशचंद्र बत्रा हे उपराजधानीतील असे नाव आहे ज्यांच्या नावावर एक-दोन नव्हे तर, अनेक बाबतीत प्रथम महिला होण्याचा मान आहे.

Bharti Batra, a dedicated personality of the patient | रुग्णसेवेला समर्पित व्यक्तिमत्त्व भारती बत्रा

रुग्णसेवेला समर्पित व्यक्तिमत्त्व भारती बत्रा

Next

सेवानिवृत्त उप-प्राचार्या : अनेक बाबतीत प्रथम महिला होण्याचा मान

उदय अंधारे  नागपूर
डॉ. भारती सुरेशचंद्र बत्रा हे उपराजधानीतील असे नाव आहे ज्यांच्या नावावर एक-दोन नव्हे तर, अनेक बाबतीत प्रथम महिला होण्याचा मान आहे. सेवेप्रति समर्पणभाव, नम्रपणा व शैक्षणिक सर्वोत्कृष्टतेचा संगम असलेले हे व्यक्तिमत्त्व आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतर्गत कार्यरत ट्रेनिंग कॉलेज आॅफ नर्सिंगच्या उप-प्राचार्या म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक खासगी महाविद्यालयांच्या आकर्षक आॅफर्स नाकारून त्या रुग्णांसाठी कार्य करीत आहेत.
डॉ. बत्रा नवी मुंबई येथील एमजीएम आरोग्य विज्ञान विद्यापीठातून नर्सिंगमध्ये आचार्य पदवी मिळविणाऱ्या प्रथम महिला आहेत. मालदीवची राजधानी माले येथे भारतीय शासनाच्यावतीने इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय उभारण्यासाठी देशभरातून २० महिलांची निवड करण्यात आली होती. या महिलांमध्ये डॉ. बत्रा महाराष्ट्रातून एकमेव होत्या. १९८०-८१ मध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट परिचारिका पुरस्कार मिळाला आहे. इंदोर येथील देवी अहल्या विद्यापीठात असताना त्यांनी एम.एससी. (नर्सिंग) अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले. एवढेच नाही तर, १९८२ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असताना जनरल नर्सिंग भाग-२ अभ्यासक्रमात तर, १९८३ मध्ये नोंदणीकृत परिचारिकांच्या प्रसुती विद्या अभ्यासक्रमात राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळविला. इयत्ता बारावीतही त्या पहिल्या आल्या होत्या.
डॉ. बत्रा यांनी मेडिकलमध्ये स्टाफ नर्स तर, मुंबईतील कामा व अलब्लेस रुग्णालयात शिक्षक म्हणून कार्य केले आहे. जीवनात परिचारिकाच व्हायचे हे त्यांनी लहानपणीच ठरविले होते. तुमसर येथे शालेय शिक्षण घेत असताना त्या नेहमी सामान्य रुग्णालयापुढून जात होत्या.
यामुळे त्यांना श्वेतवस्त्रातील परिचारिका दिसायच्या. तेव्हा त्यांनी परिचारिका होऊन समाजाची सेवा करण्याचा निश्चय केला होता. त्यांच्या निर्णयाला वडील विश्वनाथ मुदलियार यांनी भक्कम पाठिंबा दिला. त्यांचे वडील पुरोगामी विचारांचे होते. महिलांनी चार भिंतीच्या बाहेर पडून विकास करावा अशी त्यांची भूमिका होती. यामुळे त्यांनी तिन्ही मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. डॉ. बत्रा या ज्येष्ठ कन्या होत. सध्या डॉ. बत्रा स्वत:चा पूर्ण वेळ आजारी लोकांची काळजी घेणाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी देत आहेत. यासाठी त्यांनी शारीरिक व मानसिक आजारपणाचा आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या वागणुकीचा सखोल अभ्यास केला आहे.
परिचारिका म्हणून ३५ वर्षे कार्य करताना त्यांना समाजात व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये अनेक गैरसमज असल्याचे आढळून आले आहे. हे गैरसमज नष्ट करण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत. तसेच, रुग्ण आक्रमक झाल्यास काय करायला पाहिजे यावरही त्या मार्गदर्शन करीत आहेत. रुग्णांची योग्य काळजी घेतल्यास वेळ, ऊर्जा व रुग्णालयाचा खर्च वाचू शकतो. तसेच, गंभीर रुग्णांना हाताळण्याचा शासकीय रुग्णालयांवरील भार कमी होईल. निधीची बचत होईल, असे त्यांचे मत आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी त्यांनी पुस्तिकाही छापली आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आहे. यामुळे परिचारिका म्हणून कौशल्य वाढविता आले असे डॉ. बत्रा यांनी सांगितले.
त्यांना १० पुरस्कार मिळाले असून त्यांनी चार संशोधन पेपर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केले आहेत. त्यांनी स्वत:च्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. आनंद सावजी, पती डॉ. सुरेशचंद्र बत्रा व कुटुंबीयांना दिले आहे.

Web Title: Bharti Batra, a dedicated personality of the patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.