खेडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारती देवगडे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:46+5:302021-02-10T04:09:46+5:30
कामठी : कामठी तालुक्यातील खेडी-पांढुर्णा-पांढरकवडा गट ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ...
कामठी : कामठी तालुक्यातील खेडी-पांढुर्णा-पांढरकवडा गट ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक २ मधून विजयी झालेल्या भारती देवगडे यांची बिनविरोध वर्णी लागणार आहे.
दि. १५ जानेवारी रोजी झालेल्या खेडी गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १ मधून अनुसूचित जमाती (महिला) करिता राखीव असलेल्या जागेवर भारती गिरधर देवगडे विजय झाल्या; तर वॉर्ड क्रमांक २ मधून त्यांचे पती गिरिधर नारायण देवगडे हे विजयी झाले आहेत. संबंधित प्रवर्गातून भारती देवगडे या एकमेव सदस्य विजयी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची सरपंचपदी निवड होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. खेडी ग्रामपंचायतीच्या नऊ जागांच्या झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपसमर्थित आदर्श ग्रामविकास आघाडीचा आठ जागांवर विजय झाला होता. वॉर्ड क्रमांक १ मधून भाजप समर्थित आदर्श विकास आघाडीचे सच्चेलाल मनोहर घोडमारे, अनुसूचित जमाती संवर्गातून भारती गिरिधर देवगडे, तर सर्वसाधारण महिला संवर्गासाठी असलेल्या जागेवर भाग्यश्री बोरकर विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक २ मधून अनुसूचित जमाती संवर्गातून भाजपसमर्थित आदर्श विकास आघाडीचे गिरिधर नारायण देवगडे विजयी झाले. याच वाॅर्डातून सर्वसाधारण महिलेकरिता राखीव जागेतून भाजपसमर्थित आदर्श ग्रामविकास आघाडीच्या अंजना मानकर विजयी झाल्या. याच वाॅर्डातून इतर मागास प्रवर्ग महिला राखीव जागेतून काँग्रेस समर्थित संघर्ष विकास आघाडीच्या शुभांगी विलास गावंडे विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जाती असलेल्या राखीव जागेवर भाजप समर्थित आदर्श ग्रामविकास आघाडीचे सौरभ मनोहर मेंढे, इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर नामदेव रामभाऊ ठाकरे विजयी झाले आहेत.