भारतीय मजदूर संघाची केंद्र सरकारविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 07:46 PM2020-06-10T19:46:37+5:302020-06-10T19:51:16+5:30
‘सेव्ह पब्लिक सेक्टर-सेव्ह इंडिया’ अशी घोषणाबाजी करीत भारतीय मजदूर संघाने बुधवारी केंद्र सरकारविरोधात नागपुरात निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सेव्ह पब्लिक सेक्टर-सेव्ह इंडिया’ अशी घोषणाबाजी करीत भारतीय मजदूर संघाने बुधवारी केंद्र सरकारविरोधात नागपुरात निदर्शने केली.
भारतीय मजदूर संघाच्या सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय समन्वय समितीच्या आवाहनानुसार, नागपूरसह संपूर्ण विदर्भात सार्वजनिक क्षेत्राच्या प्रत्येक युनिटने तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केले. निदर्शनाचा मुख्य कार्यक्रम वेकोलिच्या क्षेत्रीय कार्यालय परिसरात झाला. भारतीय कोळसा मजदूर संघाचे महामंत्री जयंत आसोले यांच्या पुढाकारात येथे आंदोलन झाले, तर विदर्भ बँक एम्प्लॉईज फेडरेशन कार्यालय परिसरात जनरल सेक्रेटरी नितीन बोरवणकर यांच्या पुढाकारात आंदोलन झाले. निवेदनातून खासगीकरणाच्या धोरणावर टीका करण्यात आली. कमर्शियल मायनिंग, विनिवेश, खासगीकरण प्रस्ताव परत न घेतल्यास सर्व कोळसा कामगारांच्या आंदोलनातून अखिल भारतीय खदान मजदूर संघ कोळसा पुरवठा ठप्प करील, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनादरम्यान कोळसा खाणीमधील नेत्यांनी धरणे दिले. युनिटस्तरावर दिवसभर सोशल डिस्टन्सिंग ठेवून धरणे आंदोलन शांततेने पार पाडले. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी रमेश पाटील, जयंत आसोले, किशोर बापट, सुरेश चौधरी, अरविंद भूमराळकर, विघ्नेश पाध्ये, महेंद्र भिसीकर, सुनील मिश्रा, आर.एस. सिंग, सुरेंद्र गिरी, गंगाधर तायडे, अमित ढोणे, प्रमोद काळी, अर्चना सोहनी, सविता तायडे, मंदा भडंग आदींनी परिश्रम घेतले.