नगर भूमापनचे शिक्के भाटियाच्या कार्यालयात
By admin | Published: March 10, 2017 02:34 AM2017-03-10T02:34:41+5:302017-03-10T02:34:41+5:30
नगर भूमापन कार्यालयातील शासकीय उपयोगाचे दस्तावेज, रबरी शिक्के आदी साहित्य विनय भाटिया याच्या कार्यालयात आढळून आले आहेत.
गुन्हा दाखल : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले आदेश
नागपूर : नगर भूमापन कार्यालयातील शासकीय उपयोगाचे दस्तावेज, रबरी शिक्के आदी साहित्य विनय भाटिया याच्या कार्यालयात आढळून आले आहेत. प्रशासनाने या संवेदनशील प्रकरणाची अतिशय गंभीर दखल घेतली आहे. नझुल तहसिलदार विनिता लांजेवार यांच्या तक्रारीवरुन भाटिया याच्याविरुद्ध बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना विनय भाटिया याच्या संदर्भात नगर भूमापक प्रदीप मिश्रा यांनी सिटी सर्व्हे क्रमांक ३ च्या कार्यालयात येऊन संशयास्पद व्यवहार तसेच महत्त्वाच्या दस्तावेज संदर्भात तक्रार सादर केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी पोलीस स्टेशनमध्ये सदर इसमाविरुद्ध तक्रार दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
नझुल शाखेच्या तहसिलदार वनिता लांजेवार यांच्या लेखी तक्रारीवरुन लक्ष्मीनगर येथील विनय भाटिया यांच्या कार्यालयाची पोलिसामार्फत झडती घेण्यात आली. पोलिसांनी विनय भाटिया यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता त्याच्या कार्यालयात शासकीय उपयोगाचे दस्तावेज, रबरी शिक्के आढळून आले. यामध्ये नझुल शाखेचे टपाल बुक, आवक रजिस्टर, पोलिसांनी जप्त केले. शासकीय कार्यालय वापराचे महत्त्वाचे दस्तावेज खासगी व्यक्ती हाताळू अथवा बाळगू शकत नाहीत. तसेच रबरी शिक्के बनावटी दस्तावेज तयार करण्याकरिता, दस्तावेजातील मजकुरातील खोडाखोड केली आहे.(प्रतिनिधी)