मोक्काचा कैदी भाटकरला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:07 AM2021-04-06T04:07:49+5:302021-04-06T04:07:49+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला येथील मोक्काचा कैदी ओमप्रकाश भारत भाटकर याची पॅरोल याचिका फेटाळून लावली. ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला येथील मोक्काचा कैदी ओमप्रकाश भारत भाटकर याची पॅरोल याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व नितीन सूर्यवंशी यांनी भाटकरला हा दणका दिला.
भाटकर सध्या अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला मोक्का कायद्यांतर्गत शिक्षा झाली आहे. त्याने ९ ऑक्टोबर २०१९ रोजी विभागीय आयुक्तांना अर्ज सादर करून आजारी आईवर उपचार करण्यासाठी पॅरोल मागितला होता. तो अर्ज २७ डिसेंबर २०१९ रोजी नामंजूर करण्यात आला. भाटकरचा लहान भाऊ व वडील हे दोघेही आईची काळजी घेण्यासाठी घरी आहेत. तसेच, यापूर्वी भाटकरला रजेवर सोडले असता तो ३८९ दिवस फरार होता या बाबी पॅरोल नाकारताना विचारात घेण्यात आल्या होत्या. त्याविरुद्ध भाटकरने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पॅरोल नाकारण्याचा निर्णय अवैध असल्याचे त्याचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने सर्व कायदेशीर मुद्दे पडताळल्यानंतर विभागीय आयुक्तांचा निर्णय योग्य ठरवला. भाटकर पॅरोल मिळण्यासाठी पात्र नसल्याचे निरीक्षण आदेशात नोंदवण्यात आले.