नक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशयावरून भट्टाचार्य जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 10:03 PM2017-08-08T22:03:36+5:302017-08-08T22:04:54+5:30
नक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशयावरून शहरातील रहिवासी तुषार क्रांती भट्टाचार्य यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. कोलकाता येथे राहणा-या बहिणीला भेटून नागपूरकडे परत येत असताना गुजरात पोलिसांनी गोंदियाजवळ धावत्या रेल्वेगाडीत भट्टाचार्य यांना अटक केली.
नागपूर, दि. 8 - नक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशयावरून शहरातील रहिवासी तुषार क्रांती भट्टाचार्य यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. कोलकाता येथे राहणा-या बहिणीला भेटून नागपूरकडे परत येत असताना गुजरात पोलिसांनी गोंदियाजवळ धावत्या रेल्वेगाडीत भट्टाचार्य यांना अटक केली. त्यांना नंतर नागपुरात आणून विमानाने अहमदाबादला नेण्यात आले. बुधवारी त्यांना सुरतच्या कोर्टात हजर केले जाणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, गुजरात पोलिसांनी त्यांचे अपहरण केल्याचा आरोप भट्टाचार्य यांच्या आप्तजनांनी लावला आहे. या कारवाईची आम्हाला सूचनाही देण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भट्टाचार्य यांच्या विरुद्ध गुजरात पोलिसांनी २०१० मध्ये नक्षली चळवळीचा प्रचार करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यांना अटक करण्यात आली नसल्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. परंतू, भट्टाचार्य हैदराबादमध्ये शिकत असताना १९७० मध्ये ते विद्यार्थी आंदोलनात सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात भट्टाचार्य यांच्यावर २००७ मध्ये कोर्टात केस दाखल झाली. सुनावणी दरम्यान २००८ ते २०१३ पर्यंत ते आंध्रप्रदेशातील चेरलापल्ली कारागृहात बंद होते. ते कारागृहात बंदिस्त असतानाच २०१० मध्ये गुजरात पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदविला अन् त्यांना फरारही घोषित केले. त्यामुळे खुद्द भट्टाचार्य यांनी ९ मे २०११ आणि २२ जुलै २०११ ला सूरत न्यायालयाला पत्र लिहून आपण फरार नाही, कारागृहात आहो, अशी माहिती दिली होती.
दरम्यान, २०१३ मध्ये सर्व प्रकरणातून मुक्तता झाल्यामुळे आंध्रप्रदेशातील कारागृहातून बाहेर आल्यानंतर भट्टाचार्य नागपुरातील निवासस्थानी राहू लागले. उपजिवेकेसाठी ते प्रसारमाध्यमात अधूनमधून लेख लिहीत असल्याचे कुटुंबीय सांगतात. काही दिवसांपूर्वी ते बहिणीला भेटण्यासाठी कोलकाता येथे गेले होते. परत येत असताना त्यांना मंगळवारी भल्या सकाळी धावत्या रेल्वेगाडीत गुजरात पोलिसांनी त्यांना अटक केली.