‘धर्मरहस्य’ ग्रंथ सादर करून भाऊजींनी धर्माला शिस्त दिली : भारती सुदामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:33 PM2019-11-26T22:33:53+5:302019-11-26T22:36:31+5:30
भाऊजींची स्वतंत्र प्रज्ञा, प्रखर बुद्धिमत्ता, संशोधकवृत्ती, सत्यशोधक, सत्यवचनी आणि समस्येवर उपाय शोधण्याची जिद्द, हे स्व:भाववैशिष्ट्य होते. त्यांनी धर्मग्रंथाच्या अभ्यासाला बंगालच्या फाळणीनंतर सुरुवात केली आणि त्यातून १९२६ साली ‘धर्मरहस्य’ हा ग्रंथ आकाराला आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाऊजींची स्वतंत्र प्रज्ञा, प्रखर बुद्धिमत्ता, संशोधकवृत्ती, सत्यशोधक, सत्यवचनी आणि समस्येवर उपाय शोधण्याची जिद्द, हे स्व:भाववैशिष्ट्य होते. त्यांनी धर्मग्रंथाच्या अभ्यासाला बंगालच्या फाळणीनंतर सुरुवात केली आणि त्यातून १९२६ साली ‘धर्मरहस्य’ हा ग्रंथ आकाराला आला. या ग्रंथाने धर्माला नवी शिस्त प्रदान केली, असे विश्लेषण डॉ. भारती सुदामे यांनी केले.
विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथसहवासतर्फे भाऊजी दप्तरी यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त भाऊजींच्या ‘धर्मरहस्य’ ग्रंथावर चर्चेचे आयोजन केले होते. त्यात सुदामे यांनी आपले आकलन मांडले.
या ग्रंथाचा अभ्यास करण्याचे प्रयोजन काय? या ग्रंथाच्या विचारातून हाती काय गवसलं आणि गवसलं त्याचा उपयोग सद्यस्थितीत कसा आणि काय होईल? अशी तीन प्रश्ने भाऊजींनी या ग्रंथातून उपस्थित केली आहेत. बंगालच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर पुराणमतवादी आणि नवमतवादी असे गट पडले होते. भाऊजी नवमतवादी गटातले. हा ग्रंथ सत्य, सनातन धर्म, समन्वयात्मक जुन्या-नव्या मतांचा सुवर्णमध्य साधणारा आणि सर्वधर्म एकाच पद्धतीने निर्माण झाले आहेत, हे ठासून सांगणारा आहे. हा ग्रंथ वेदांतासंबंधी आमूलाग्र नवीन दृष्टिकोन मांडणारा ठरला आणि त्यांची मते खोडून काढणे कुणालाच शक्य झाले. त्यातून धर्मनिर्णय मंडळाची निर्मिती झाल्याचे सुदामे यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. राजेंद्र डोळके यांनीही भाष्य केले. परिचय डॉ. विलास देशपांडे यांनी करवून दिला. डॉ. विलास देशपांडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत दिलीप म्हैसाळकर यांनी केले. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग, भाऊजी दप्तरी ट्रस्टचे राम दप्तरी, सुरेखा बापट, प्रतिमा आकरे, अपर्णा प्रभुणे, अरुण खोडे, प्रमोद कुलकर्णी, स्नेहल आगाशे, जयंत सुदामे, रेवती कुळकर्णी उपस्थित होते. संचालन प्रा. विवेक अलोणी यांनी केले.