भावना गवळींनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, उमेदवारीचा तिढा कायम
By योगेश पांडे | Published: April 1, 2024 10:19 PM2024-04-01T22:19:21+5:302024-04-01T22:19:52+5:30
यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव महायुतीकडून जाहीर झालेले नाही. या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांनी सोमवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
नागपूर : महायुतीतील सर्वच जागांवर अद्याप वाटप झालेले नसून यवतमाळ-वाशिमचा तिढा कायम आहे. या मतदारसंघातून परत उमेदवारीसाठी इच्छक असलेल्या भावना गवळी यांनी सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट घेतली. सुमारे अर्धा तास त्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी काहीही न बोलता थेट निघून गेल्या. त्यामुळे विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव महायुतीकडून जाहीर झालेले नाही. या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांनी सोमवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भावना गवळी या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घरी पोहोचल्या. देवेंद्र फडणवीसांच्या घरात जाण्यापूर्वी भावना गवळी यांची गाडी बाहेर थांबली होती. तेव्हा भावना गवळी यांनी मी बाहेर आल्यानंतर बोलते, असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
भावना गवळी जवळपास २५ मिनिटे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत्या. मात्र त्यानंतर त्यांनी फडणवीसांच्या निवासस्थानाच्या आत कार बोलावून घेतली व काहीही प्रतिक्रिया न देता तेथूनच गाडीत बसून निघून गेल्या. अंगणात आपली गाडी बोलावून घेतली व भावना गवळी तिथूनच गाडीत बसून निघून गेल्या. त्यामुळे या भेटीतील चर्चेविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.