भय्याजी जोशी ठरले संघविस्ताराचे चाणक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:07 AM2021-03-21T04:07:51+5:302021-03-21T04:07:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वयाच्या ७४ व्या वर्षांपर्यंत जबाबदारी सांभाळलेल्या भय्याजी जोशी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदाचा एक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वयाच्या ७४ व्या वर्षांपर्यंत जबाबदारी सांभाळलेल्या भय्याजी जोशी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदाचा एक तपाचा प्रवास शनिवारी संपला. मागील काही काळापासून संघाच्या कार्यविस्तारात जोशी यांचे नियोजन फार महत्त्वाचे ठरले. संघकार्याच्या विस्ताराचे शिवधनुष्य पेलणे ही सोपी बाब नव्हती. मात्र संघसेवेसाठी सर्वस्व वाहून घेतलेल्या सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी मात्र केवळ संघकार्याचा विस्तारच केला नाही तर, देशात संघाचे वर्चस्व निर्माण करण्यात मौलिक भूमिका पार पाडली. खऱ्या अर्थाने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनात ते संघासाठी ‘चाणक्य’च ठरले, असे संघधुरिणांचे मत आहे. जोशी यांनी पुढील कार्यकाळासाठी दत्तात्रेय होसबळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मार्च २००९ साली झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधीसभेत जोशी सरकार्यवाहपदी पहिल्यांदा निवड करण्यात आली. त्यानंतर सातत्याने त्यांची निवड झाली व १२ वर्षांत त्यांनी संघाला तरुणाईपर्यंत नेण्यात मौलिक भूमिका पार पाडली. प्रकृती ठीक नसतानादेखील त्यांनी कर्तव्य बजावत संघविस्ताराचे सखोल नियोजन केले होते.
कोरोनाकाळात देशभरात प्रवास
कोरोनामुळे २०२० साली संघाची अ.भा. प्रतिनिधीसभा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरात सरसंघचालक व भय्याजी जोशी यांनी देशभराचा प्रवास केला. कोरोनामुळे संघ पदाधिकारी व स्वयंसेवकांच्या आरोग्याला अपाय होऊ नये, यासाठी जोशी यांनी स्वतः देशातील सर्व क्षेत्रात जाण्यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय लॉकडाऊनमध्ये देशपातळीवर झालेल्या मदतकार्यातदेखील त्यांच्या मार्गदर्शनात नियोजन झाले होते.
शेषाद्रीनंतर सर्वाधिक काळ सलग सरकार्यवाह
भय्याजी जोशी हे १२ वर्षे सलग सरकार्यवाह राहिले. तर हो.वे. शेषाद्री यांनी १३ वर्षे या पदाची सलग धुरा सांभाळली होती. शेषाद्री १९८७ साली सरकार्यवाह झाले होते व २००० सालापर्यंत ते त्या पदावर होते.
हे राहिले सरकार्यवाह
गोपाल मुकुंद हुद्दार - १९२९ ते १९३१
डी.आर. लिमये - १९३१ ते १९३४
एच.व्ही. कुलकर्णी - १९३४ ते १९३७
जी.एस. पाध्ये - १९३७ ते १९३९
गोळवलकर गुरुजी - १३ ऑगस्ट १९३९ ते ३ जुलै १९४०
भय्यासाहेब काळे - १९४० - १९४५
भय्याजी दाणी - १९४५ ते १९५६
एकनाथ रामकृष्ण रानडे - १९५६ ते १९६२
भय्याजी दाणी - १९६२ ते १९६५
बाळासाहेब देवरस - १९६५ ते १९७३
माधव मुळे - १९७३ ते १९७७
रज्जूभय्या - १९७७ ते १९८७
हो.वे. शेषाद्री - १९८७ ते २०००
डॉ. मोहन भागवत - २००० ते २००९
भय्याजी जोशी - २००९ ते २०२१