नागपुरात भीमा कोरेगावचे पडसाद : बसवर दगडफेक , ठिकठिकाणी टायरची जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:53 AM2018-01-03T00:53:08+5:302018-01-03T00:56:43+5:30
भीमा कोरेगावमध्ये शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यास गेलेल्या भीम सैनिकांवर सोमवारी झालेल्या दगडफेकीचे नागपुरात मंगळवारी तीव्र पडसाद उमटले.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : भीमा कोरेगावमध्ये शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यास गेलेल्या भीम सैनिकांवर सोमवारी झालेल्या दगडफेकीचे नागपुरात मंगळवारी तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने विविध भागात पुतळा दहन केले, टायर जाळले आणि बसची तोडफोड करतानाच रस्ताही अडवून धरला. संविधान चौकापासून उत्तर नागपुरातील विविध भागात दुपारपासून प्रचंड तणाव निर्माण होत असल्याचे पाहून पोलिसांनी जोरदार बंदोबस्त लावला. राज्य राखीव दलाच्या मदतीने संतप्त जमावाला आवरत पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. दरम्यान, रात्री कामठीतही दोन बस फोडण्यात आल्या.इंदोऱ्यात रात्री दगडफेक झाली.
भीमा कोरेगावमधील घटनेची माहिती कळाल्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच उत्तर नागपुरातील वातावरण तापू लागले होते. भीमसैनिकांवर दगडफेक करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोह तसेच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी करीत तरुण दुपारपासून विविध भागात एकत्र होऊ लागले. घोषणाबाजी सुरू झाली. दुपारी १२.३० च्या सुमारास जरीपटक्यातील भीम चौक, इंदोरा, कमाल चौकात टायर जाळून सरकारविरोधी घोषणाबाजी करीत भीमसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर मोठ्या संख्येत आंबेडकरी अनुयायी संविधान चौकात गोळा झाले. त्यांनी घोषणाबाजी करीत घटनेचा निषेध नोंदवत रस्त्यावर ठाण मांडले. त्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण झाला. काहींनी येथेही टायर जाळले. तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांचा प्रचंड ताफा घटनास्थळी पोहचला. राखीव दलाच्या तुकड्यांही बोलवून घेण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांची समजूत काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याची विनंती केली.
जिल्हा प्रशासन व राजकीय नेत्यांचे शांततेचे आवाहन
भीमा कोरेगाव येथील घटनेवर सर्व तीव्र नाराजी व निषेध व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भीमसैनिकांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. बावनकुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, समाजात विविध अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांमुळे समाजात तेढ निर्माण होईल, अशा कृत्यांना नागरिकांनी बळी पडू नये व शांतता राखावी. समाज माध्यमावर विविध प्रकारच्या अफवा पसरविण्यात येतात. त्यांच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही बावनकुळे यांनी केले आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या अॅड. सुलेखा कुंभारे यांनी हल्ल्याचा निषेध केला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. यादरम्यान भीमसैनिकांनी संयम पाळावा असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. प्रकाश गजभिये आदींनी शांततेचे आवाहन केले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका : पोलीस आयुक्त
देशाचे हृदयस्थळ असलेले नागपूर शहर सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानले जाते. जातीयवादाला येथे थारा नाही. त्यामुळे भीमा कोरेगावच्या घटनेच्या संबंधाने जे काही आंदोलन करायचे, ते शांततेने करावे. नागरिकांनी शांतता बाळगून आपल्या नागपुरात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील सर्व सीसीटीव्ही सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक वातावरण बिघडविण्याचा कुणी प्रयत्न करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी लोकमतशी बोलताना केले.
संघाने केला भीमा कोरेगाव हिंसाचाराचा निषेध
भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध केला आहे . या हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी संघाने केली आहे.
संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रक जारी करून संघाची भूमिका स्पष्ट केली आहे . कोरेगाव हिंसाचार हा निषेधार्ह आणि दु:खद आहे . या घटनेचा आम्ही निषेध करतो . जे यात दोषी आढळतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे . समाजात तेढ निर्माण करण्याचा काही छुप्या शक्ती प्रयत्न करत आहेत. अशा समाजकंटकांच्या जाळ्यात लोकांनी अडकू नये. नागरिकांनी समाजात शांतता व एकता कायम ठेवावी, असे आवाहन संघातर्फे डॉ. वैद्य यांनी केले .