‘भिडू....’, नागपुरात खासदार महोत्सवाची ‘झकास’ सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:28 PM2018-11-30T23:28:09+5:302018-11-30T23:42:34+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या ३५-४० वर्षापासून आपल्या अभिनयाने, दिलखेचक संवादाने आणि व्यवहाराने स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारे ते दोघे. एक स्वत:च्याच व्यक्तिरेखेतून मिळालेल्या ‘भिडू’ या नावाने प्रसिद्ध तर दुसरा विशिष्ट शैलीने रसिकांना आपलासा करणारा ‘झकास’ कलावंत. दोघेही पक्के मित्र आणि चित्रपटातूनच मिळालेल्या ‘राम लखन’ या नावानेच लोकप्रियही झाले. आपण अभिनेते जॅकी श्राफ आणि अनिल कपूर यांच्याविषयी बोलतोय. शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून मायानगरीतील ‘राम लखन’ची ही जोडी साक्षात नागपूरकर श्रोत्यांपुढे आली आणि ‘खासदार महोत्सवा’ची ‘झकास’ सुरुवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या ३५-४० वर्षापासून आपल्या अभिनयाने, दिलखेचक संवादाने आणि व्यवहाराने स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारे ते दोघे. एक स्वत:च्याच व्यक्तिरेखेतून मिळालेल्या ‘भिडू’ या नावाने प्रसिद्ध तर दुसरा विशिष्ट शैलीने रसिकांना आपलासा करणारा ‘झकास’ कलावंत. दोघेही पक्के मित्र आणि चित्रपटातूनच मिळालेल्या ‘राम लखन’ या नावानेच लोकप्रियही झाले. आपण अभिनेते जॅकी श्राफ आणि अनिल कपूर यांच्याविषयी बोलतोय. शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून मायानगरीतील ‘राम लखन’ची ही जोडी साक्षात नागपूरकर श्रोत्यांपुढे आली आणि ‘खासदार महोत्सवा’ची ‘झकास’ सुरुवात झाली.
नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार महोत्सवाचे हे दुसरे वर्ष. क्रीडा महाविद्यालयाच्या मैदानावर होणारे हे भव्यदिव्य आयोजन तसे संत्रानगरीच्या कलारसिकांसाठी सांस्कृतिक मेजवानीच होय. या मेजवानीचे क्रीडा मैदानावर शुक्रवारी दमदार उद््घाटन झाले. सुरुवातीला गीत-संगीताची बहारदार मैफिल सुरू झाली होती. मंचावरील गायक-वादक कलावंतांनी जुन्या-नवीन गीतांचे सादरीकरण करून वातावरण निर्मिती केली होती. अशात गायकांनी कर्मा चित्रापटातील ‘दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिये...’ हे गाणे सुरू केल्याने येथील वातावरण देशभक्तीने भारावले होते. अशातच या चित्रपटात व गीतातही अभिनय करणारे राम-लखन ऊर्फ जॅकी आणि अनिलचे मैदानावर आगमन झाले आणि स्क्रिनचा कॅमेरा त्यांच्याकडे वळताच दर्शकांनी एकच जल्लोष केला. गीताचे संगीत वाजत असताना नितीन गडकरी यांनी दोघांनाही मंचावर आणले. यावेळी या दोघांनीही ‘जान भी देंगे ऐ वतन तेरे लिये...’ च्या सुरात सुर मिळविला.
महोत्सवाच्या औपचारिक उद्घाटनप्रसंगी दोन्ही अभिनेते व नितीन गडकरी यांच्यासमवेत कांचन गडकरी, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आमदार गिरीश व्यास, कवी मधुप पांडेय, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, जयप्रकाश गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर प्रास्ताविक आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले. संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले.
शहराचा सर्वांगीण विकासाचा संकल्प : गडकरी
उद्घाटनप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी शहरात होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली. चांगले रस्ते, पाणी, गरिबांना घर या मूलभुत सुविधा उपलब्ध करणे हे लोकप्रतिनिधींचे कामच आहे. मात्र यासोबत आरोग्य, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राचा विकास होणे महत्त्वाचे आहे. राज्य शासनाच्या पुढाकारातून शहरात ६० व संपूर्ण जिल्ह्यात ३५० क्रीडा मैदाने विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात कबड्डी, खोखो, हॉकी या देशी खेळांसह फुटबॉल आणि अॅथ्लेटीक्सच्या सुविधांचाही विचार केला गेला आहे. आयआयटी, एम्स यांसारख्या शैक्षणिक व आरोग्य संस्था नागपुरात होत आहेत. त्यांनी विदर्भात सुरू असलेल्या एकल विद्यालयांचाही उल्लेख केला. यासोबत सांस्कृतिक विकास होणेही गरजेचे आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत असून हा महोत्सव त्याचेच प्रतीक आहे. यामध्ये देशातील नावाजलेल्या कलावंतांचे कार्यक्रम आहेतच, मात्र सोबत शहरातील १००० कलावंतांना त्यांची कला सादर करण्यासाठी मंच मिळत असल्याचे ते म्हणाले. हा सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहचावा, त्यांना प्रेरणा मिळावी हाच प्रयत्न आहे. या शहराचा व विदर्भाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गडकरींनी केला रस्त्यांचा कायापालट : अनिल कपूर
यावेळी अभिनेता अनिल कपूर यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. आता मी देशातील अनेक भागात जात असतो. पूर्वी ज्या रस्त्याने जाणे शक्य नव्हते त्यांचे रुंदीकरण झाले आहे. गडकरी यांनी रस्त्यांचा कायापालट केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या पुढाकाराने नागपूर शहराचाही कौतुकास्पद विकास होत असल्याचे कपूर म्हणाले. त्यांच्या आग्रहाने व नागपूरकरांच्या प्रेमापोटी मी येथे आलो असल्याची कबुली चाहत्यांच्या लखनने दिली.