ओबीसी विद्यार्थ्यांनी मागितली सरकारसाठी भीक, अनोख्या आंदोलनाने वेधले लक्ष
By आनंद डेकाटे | Published: September 21, 2023 02:20 PM2023-09-21T14:20:00+5:302023-09-21T14:24:45+5:30
वसतिगृहे, आधार योजना, परदेशी शिष्यवृत्ती याकडे वेधले शासनाचे लक्ष
नागपूर : ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वसतिगृहे, आधार योजना, परदेशी शिष्यवृत्ती आदी महत्त्वाच्या योजना आहेत. परंतु या योजना वित्त विभागाने अडवून ठेवल्या आहे. त्यामुळे या मागण्या पूर्ण करण्यासाठी ओबीसी विद्यार्थ्यांनी गुरूवारी भीक मागो आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले.
ओबीसी युवा अधिकार मंचातर्फे रेशिमबाग चौकात हे अभिनव भीक मागो आंदोलन गुरुवारी करण्यात आले. ओबीसी युवा अधिकार मंचचे संयोजक उमेश कोर्राम यांनी सांगितले की, मागील ६ वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या ७२ वसतीगृहाचा विषय शासनाने अजूनही सोडवला नाही. राज्य शासनाचा वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग आताही गंभीर नाही. यामुळे पुन्हा एकदा ओबीसी विद्यार्थी वसतिगृहे आणि आधार योजनेपासून वंचित राहू शकतात.
शाळा महाविद्यालये सुरू होवून ३ महिने उलटले आहेत तरी ७२०० विद्यार्थ्यांसाठी ७२ ओबीसी वसतिगृहे, २१,६०० विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना, ७५ विद्यार्थ्यांसाठी विदेश शिष्यवृत्ती योजना यावर निर्णय झालेला असतांना अजूनही वरील योजना शासनाने सुरू केल्या नाहीत. या योजना महाराष्ट्र शासनाच्या वित्त व बहुजन कल्याण विभागाने अडवून ठेवल्या आहेत. चालढकल करत शासन ओबीसी समाजावर अन्याय करत आहे. ५२ टक्केच्या वर असलेल्या कष्टकरी, अन्नदाता समाजाची शासनाला पर्वा नाही. शासनाकडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी निधी नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
या माध्यमातून मिळालेली भीक शासनाच्या वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागास मनी ऑर्डर द्वारे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलनात पियुष आकरे, कृतल आकरे, रमेश पिसे, मिरा मदनकर मुकुंद अडेवार, आकाश वैद्य, अनुप खड्डकर, रजत लांजेवार, देवेंद्र समर्थ,धीरज भिसिकर पंकज सावरबांधे, निकेश पिने, नयन कालबांडे, मनीष गिरडकर, सोनू फतींग हे उपस्थित होते.