संविधानाच्या अंमलबजावणीसाठी भिक्खूंचा पुढाकार

By Admin | Published: December 28, 2014 12:36 AM2014-12-28T00:36:52+5:302014-12-28T00:36:52+5:30

भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. संविधानात सर्व धर्मांना समान न्यायाची तरतूद आहे. परंतु अलीकडे धर्माच्या नावावर अल्पसंख्यक समुदायाला घाबरविण्याचे षड्यंत्र सुरू आहे.

Bhikkhu's initiative for the implementation of the Constitution | संविधानाच्या अंमलबजावणीसाठी भिक्खूंचा पुढाकार

संविधानाच्या अंमलबजावणीसाठी भिक्खूंचा पुढाकार

googlenewsNext

नागपूर : भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. संविधानात सर्व धर्मांना समान न्यायाची तरतूद आहे. परंतु अलीकडे धर्माच्या नावावर अल्पसंख्यक समुदायाला घाबरविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. हे देशासाठी घातक असून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा देशाला अखंड ठेवण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत आनंद महास्थवीर यांनी येथे व्यक्त केले.
संविधानाच्या अंमलबजावणीसाठी बौद्ध भिक्खूंनी पुढाकार घेतला असून त्यासाठी नागपुरातील बुद्धनगरी येथे दोन दिवसीय राष्ट्रीय भिक्खू संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सुद्धा त्यांनी पत्रपरिषदेत दिली. याबाबत अधिक माहिती देताना भदंत आनंद यांनी सांगितले की, अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती, वंदना संघ आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने २५ व २६ जानेवारी रोजी नागपुरातील बुद्धनगरी येथे राष्ट्रीय भिक्खू संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय संविधानाने दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा, धर्म उपासना, श्रद्धा यांच्या स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेण्याचे षड्यंत्र सध्या देशात सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहेत. धर्मांतरविरोधी कायदा आणणे हा त्यातीलच एक प्रकार आहे. धर्मांतरविरोधी कायदा हा संविधानाचे उल्लंघन करण्याचाच प्रयत्न आहे. त्याला केंद्र सरकारकडूनही बळ मिळणे, हे एकूणच देशासाठी घातक आहे. नागपुरात होणाऱ्या दोन दिवसीय संमेलनात देशभरातून भिक्खू सहभागी होतील. त्यात यावर सविस्तर चर्चा केली जाईल. तसेच देशभरातील बौद्धांच्या संघटनांची मोट बांधण्याचा यातून प्रयत्न केला जाईल. यानतर बौद्ध भिक्खू देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन संविधानाच्या अंमलबजवणीसाठी प्रचार प्रसार करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रपरिषदेला भदंत प्रज्ञाशील थेरो, भदंत सत्यानंद महाथेरो, भदंत धम्मनाग, भदंत हर्षबोधी, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भय्याजी खैरकर, सचिन मून, प्रा. देवदास घोडेस्वार, एस.एस. चंद्रिकापुरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Bhikkhu's initiative for the implementation of the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.