उपराजधानीत २२ फेब्रुवारीच्या भीम आर्मी मेळाव्याला कठोर अटींसह परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:53 PM2020-02-21T13:53:37+5:302020-02-21T13:53:59+5:30
भीम आर्मी संघटनेच्या वतीने रेशीमबाग मैदानावर दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी कठोर अटींसह परवानगी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भीम आर्मी संघटनेच्या वतीने रेशीमबाग मैदानावर दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी कठोर अटींसह परवानगी दिली आहे. तसेच, अटींचे उल्लंघन झाल्यास जबाबदार व्यक्तींवर फौजदारी व न्यायालय अवमाननेची कारवाई केली जाईल असे निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व माधव जामदार यांनी हा निर्णय दिला.
आयोजकांनी केवळ दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेतच हा मेळावा घ्यावा व सायंकाळी ६ वाजेपर्यंत मैदान पूर्णपणे रिकामे करावे. कार्यकर्ता मेळाव्याच्या मर्यादा ओलांडल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. मेळाव्याला विरोध प्रदर्शन आंदोलनामध्ये परिवर्तित होऊ देऊ नये. मेळाव्याचा राजकीय हेतुसाठी उपयोग करू नये. समाजामध्ये एकमेकांविषयी द्वेष निर्माण होईल, देश व नागरिकांची प्रतिमा खालावेल, देशाच्या सार्वभौमत्वतेला व अखंडतेला धक्का पोहचेल आणि कायदा व सुव्यवस्था संपुष्टात येईल अशी कोणतीही कृती वा वक्तव्ये मेळाव्यात सहभागी होणाऱ्यांनी करू नयेत. मेळावा शांतता व सन्मानपूर्ण वातावरणात पार पाडावा या अटी न्यायालयाने लागू केल्या. तसेच, संघटनेचे संस्थापक अ?ॅड. चंद्रशेखर आझाद (रावन) व जिल्हाध्यक्ष प्रफु ल्ल शेंडे (मेळावा आयोजक) यांनी या अटींचे काटेकोर पालन केले जाईल असे हमीपत्र न्यायालयाच्या प्रबंधक कार्यालयात सादर करावे असेही न्यायालयाने सांगितले.
१७ फेब्रुवारीला कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून मेळाव्याला परवानगी नाकारली होती. त्या आदेशाविरुद्ध भीम आर्मीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती याचिका मंजूर करून १७ फेब्रुवारीचा वादग्रस्त आदेश रद्द केला आणि मेळाव्याला सशर्त परवानगी दिली. पोलिसांनी वादग्रस्त आदेशात केवळ कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून परवानगी नाकारण्यात येत असल्याचे कारण दिले होते. त्यानंतर त्यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून अन्य मुद्दे मांडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भीम आर्मी यांची विचारधारा परस्परभिन्न आहे. तसेच, आझाद व शेंडे नेहमीच कायद्याचे उल्लंघन करतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता भीम आर्मीला हेडगेवार स्मारक भवनाजवळ असलेल्या रेशीमबाग मैदानावर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली नाही असे पोलिसांनी सांगितले होते. याचिकाकर्त्यांतर्फे अ?ॅड. फिरदोस मिर्झा तर, सरकारतर्फे अ?ॅड. केतकी जोशी यांनी कामकाज पाहिले.