भीमा कोरेगावचे धागेदोरे नागपुरात; पुणे पोलिसांचा अॅड. गडलिंग यांच्या घरावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:16 PM2018-04-17T13:16:46+5:302018-04-17T13:16:56+5:30
भीमा कोरेगाव जातीय दंगलीत महत्त्वाची भूमिका वठविल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी येथील अॅड.सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी आज मंगळवारी पहाटे छापा घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भीमा कोरेगाव जातीय दंगलीत महत्त्वाची भूमिका वठविल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी येथील अॅड.सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी आज मंगळवारी पहाटे छापा घातला. पुणे पोलिसांच्या दोन पथकांतीलअधिकारी, कर्मचारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अॅड. गडलिंग यांच्या घरात तपासणी करीत होते.
विशेष म्हणजे, अॅड. गडलिंग हे गडचिरोली-गोंदियातील माओवादी आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या बाजूने नेहमीच वकिलपत्र घेतात. नागपूर -विदर्भातील फ्रंटल आॅर्गनायझेशनवर नक्षलविरोधी अभियान तसेच स्थानिक पोलीस अनेक वर्षांपासून नजर ठेवून आहे. गडचिरोली-गोंदियातील फ्रंटल आॅर्गनायझेशनने पुणे, मुंबई, नाशिकसह विविध ठिकाणी जाळे विणल्याच्या अधून मधून बातम्या येतात. भीमा कोरेगाव प्रकरणात उसळलेल्या दंगलीत फ्रंटल आॅर्गनायझेशनने सक्रीय भूमीका वठविल्याची माहिती पुणे पोलिसांनी संकलित केल्याचे समजते. या दंगलीत नागपुरातून काही जणांनी महत्त्वाची भूमिका वठविल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर पुणे पोलिसांची दोन पथके आज पहाटे नागपुरात धडकली. त्यांनी स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अॅड. गडलिंग यांच्या इंदोरा येथील निवासस्थानी छापा घातला. वृत्त लिहिस्तोवर तेथे नेमके काय हाती लागले, ते स्पष्ट होऊ शकले नाही.