भीम माझा सूर्याची सावली! दीक्षाभूमीवर उतरले निळ्या पाखरांचे थवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:25 PM2018-10-17T23:25:26+5:302018-10-17T23:29:29+5:30
होता अंधार युग, आमच्या पावलोपावली...धम्माच्या क्षितिजावर भीम झाला सूर्याची सावली...असे भीमस्तुतीचे गीत ओठांवर सजवून...पंचशीलाची पताका खांद्यावर घेऊन ‘जयभीम’च्या जल्लोषात निळया पाखरांचे काफिले -दीक्षाभूमीवर पोहोचण्याचे सत्र बुधवारी रात्री उशिरापर्यंत अविरत सुरूच होते़ १४ आॅक्टाबेर १९५६च्या सम्यक क्रांतीच्या इतिहासाला पुन्हा एकदा नव्याने उजाळा मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : होता अंधार युग, आमच्या पावलोपावली...धम्माच्या क्षितिजावर भीम झाला सूर्याची सावली...असे भीमस्तुतीचे गीत ओठांवर सजवून...पंचशीलाची पताका खांद्यावर घेऊन ‘जयभीम’च्या जल्लोषात निळया पाखरांचे काफिले -दीक्षाभूमीवर पोहोचण्याचे सत्र बुधवारी रात्री उशिरापर्यंत अविरत सुरूच होते़ १४ आॅक्टाबेर १९५६च्या सम्यक क्रांतीच्या इतिहासाला पुन्हा एकदा नव्याने उजाळा मिळाला.
शतकानुशतकापासून चालत आलेल्या वर्गव्यवस्थेला जिथे बाबासाहेबांनी मूठमाती दिली त्या वैचारिक क्रांतिभूमीला नतमस्तक करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी येत आहे. दीक्षाभूमीचा भव्य स्तूप बघताच ते येथील माती मोठ्या अभिमानाने कपाळी लावत होते़ चिमुकल्यांपासून ते वृद्धापर्यंतच्या या गर्दीत सर्वांना एका सूत्रात बांधणारा धम्माचा विचार मात्र सारखाच होता. बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्यासाठी ही सारी मंडळी उन्हातान्हाची पर्वा न करता या पवित्र दीक्षाभूमीवर एकवटत होती.
दीक्षाभूमीवर भेटलेली निळाई :आजीला दाखवली दीक्षाभूमी
नीट उभेही राहता येत नसलेल्या आजीचा हात पकडत तिची नात दीक्षाभूमीचा परिसर दाखवित होती. नांदेडवरून या दोघीच जणी आल्या. ७५ वर्षीय आजी रुख्माबाई नरवाडे यांना बोलते केल्यावर त्या म्हणाल्या, बाबासाहेबानं आम्हाले घाणीतून बाहेर काढले. त्याचे स्मरण व्हावं म्हणून दरवर्षी येते. बाबासाहेबांनी दीक्षा दिली त्यावेळी १३ वर्षांची होती. तेव्हापासून ते आतापर्यंत नागा पडला नाही. पूर्वी कुटुंबासोबत यायची,नंतर एकटीच, या वर्षी नातीन सोबत आली, माह्या लेकरांना भेटायला, असे म्हणत त्या थांबल्या. जवळ असलेली पाण्याची बॉटल बाहेर काढत, बापू पाणी पितं का, म्हणून बॉटल समोर केली आणि लुगड्याच्या ओटीत असलेल्या पुडक्यातून बुंदी हातात दिली. ती म्हणाली, बापू या दिवसामुळं आपला नवीन जन्म झाला. त्याले विसरायला नगं.
परभणीतून आले ७० वर्षांचे ‘तरुण’
देशाच्या कानाकोपऱ्याच्या खेड्यापाड्यांमधून हजारो आंबेडकर अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर येतात. यात संभाजी घोडके या ७० वर्षीय भीम सैनिकाचाही समावेश होता. डोक्यावर लाल पगडी, अंगावर कोट, कमरेला धोतर, हातात काठी आणि डोक्यावर पुस्तक, भाकरी आणि चादरीचे गाठोडं घेऊन ते आले आहेत तरुणाला लाजवेल असा त्यांचा रुबाब होता. ते अनेकांना भेटत होते, जयभीम म्हणून परिचय वाढवित होते. त्यांचा मोबाईल नंबर डायरीत नमूद करीत होते. ते म्हणाले ‘भीम को वंदन करने और मेरे परिजनोंको मिलने हर साल आता हूं’