भिष्णूरचा योगेश झाला ‘आरोग्यदूत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:54+5:302021-02-10T04:09:54+5:30
जलालखेडा : नरखेड तालुक्यात भिष्णूर येथे राहणारा योगेश वासुदे नासरे रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. गत दोन वर्षांपासून नागपूर येथील ...
जलालखेडा : नरखेड तालुक्यात भिष्णूर येथे राहणारा योगेश वासुदे नासरे रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. गत दोन वर्षांपासून नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) तो नि:स्वार्थ रुग्णसेवा करत आहे. मेडिकलची पायरी चढल्यावर अनेकांना घाम फुटतो. कुठे जावे, कुणाला मदत मागावी हे कळत नाही. त्यामुळे तिथे आलेल्या रुग्णांना योग्य त्या ठिकाणी नेऊन योगेश मदत करतो. विशेष म्हणजे ही सेवा करताना त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारचा मोबदला तो घेत नाही. योगेशला लहानपणापासून समाजसेवेची आवड होती. योगेशच्या कुटुंबात आई-वडील, एक छोटा भाऊ आहे. आई-वडील ठेक्याने शेती करून उदरनिर्वाह करतात. योगेशचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले आहे. गत दोन वर्षांपासून मेडिकल येथे त्याचे सेवाकार्य सुरू आहे. परिस्थिती गरिबीची असली तरी मनाचा मोठेपणा दाखवत रुग्णांची नि:स्वार्थ सेवा करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्याची रुग्णसेवेसाठी असलेली धडपड पाहून मेडिकल कॉलेजचे डॉ. गिरीश भुयार यांनी त्याची राहण्याची व्यवस्था करून दिली आहे. त्याच्या या कार्याला पुरुषोत्तम भोसले, राज खंडारे, प्रदीप उबाळे यांचे पाठबळ आहे. योगेश सकाळी ८ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत रुग्णांची सेवा करतो. त्याच्या या कार्याला सलाम!
माझ्या आईचा २६ डिसेंबर २०२० ला अपघात झाला. त्यामुळे मी आईला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे गेल्यावर मला काही सुचत नव्हते. रात्री ९ वाजता योगेश नासरे यांची भेट झाली. त्यांनी मला आईची प्रकृती ठीक होईपर्यंत मदत केली.
-भास्कर बालपांडे
सावरगाव, ता. नरखेड