नागपूर जिल्ह्यातील भिवापूर भागात वऱ्हाड्यांची बोलेरो उलटली, दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:10 PM2018-05-07T15:10:04+5:302018-05-07T15:10:19+5:30
लग्नाचा स्वागत समारंभ (रिसेप्शन) आटोपल्यानंतर वऱ्हाड्यांना घेऊन जात असलेल्या बोलेरोच्या चालकाचा ताबा सुटल्याने ती बोलेरो (मालवाहू) रोडच्या वळणावर उलटली. ही बोलेरोने दोन कोलांट उड्या घेतल्या. त्यात दोन वऱ्हाड्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. सर्व जखमींवर नांद प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. लग्नसोहळ्याला गालबोट लावणारी ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदनजीकच्या पांजरेपार (ता. भिवापूर) शिवारात शनिवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नाचा स्वागत समारंभ (रिसेप्शन) आटोपल्यानंतर वऱ्हाड्यांना घेऊन जात असलेल्या बोलेरोच्या चालकाचा ताबा सुटल्याने ती बोलेरो (मालवाहू) रोडच्या वळणावर उलटली. ही बोलेरोने दोन कोलांट उड्या घेतल्या. त्यात दोन वऱ्हाड्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. सर्व जखमींवर नांद प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. लग्नसोहळ्याला गालबोट लावणारी ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदनजीकच्या पांजरेपार (ता. भिवापूर) शिवारात शनिवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली.
राजकुमार सूर्यभान रामटेके (४८) व अशोक टिकाराम खोब्रागडे (४०) दोघेही रा. भिसी, ता. चिमूर, जिल्हा चंद्रपूर अशी मृतांची नावे आहेत. ईश्वर बन्सोड, रा. भिसी आणि यशवंतराव मेंढे, रा. दारोडा, ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांच्या मुलाचा विवाहसोहळा भिसी येथे शुक्रवारी (दि. ४) पार पडला. ही सर्व मंडळी दारोडा येथे मेंढे यांच्याकडे शनिवारी ‘रिसेप्शन’साठी आली होती. ‘रिसेप्शन’आटोपल्यानंतर ते एमएच-३४/एव्ही-०६२४ क्रमांकाच्या मालवाहू बोलेरोने रात्री १० वाजतानंतर भिसी येथे जाण्यास निघाले. बोलेरोमध्ये एकूण २० जण होते. दरम्यान, पांजरेपार शिवारातील वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली बोलेरो रोडच्या कडेला उलटून दोन कोलांट उड्या घेतल्या.
अपघात होताच वऱ्हाड्यांनी आरडाओरड केली. ही बाब लक्षात येताच मागे असलेल्या दुसऱ्या वाहनातील वऱ्हाडी थांबले व त्यांच्या मदतीला धावले. त्या वाहनात महिला व मुले होते, शिवाय जवळच असलेल्या पांजरेपार येथील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
नागरिकांनी सर्वांना वाहनातून काढून नांद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले तर अन्य जखमींवर प्रथमोपचार करून नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची व्यवस्था केली. दोन्ही मृतदेहांवर उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
जखमींची प्रकृती धोक्याबाहेर
जखमींमध्ये वधूचे वडील ईश्वर बन्सोड (४०), राजकुमार इंगोले (४०), रितिक इंगोले (१३), मारोती वाजेकर (४०), तुळशीराम बन्सोड (४४), सूरज इंगळे (२२), आकाश इंगोले (२२), सीताराम भुजबळ (६०), वैभव बसेशंकर (१७), नामदेव ढाक (६५) सर्व रा. भिसी, जिल्हा चंद्रपूर, विजय ढाक (३०, रा. मेंढा, जिल्हा चंद्रपूर), तुळशीदास पेठाने (४०), करण पेठाने (१३) दोघेही रा. आरमोरी, जिल्हा गडचिरोली, कुंडलिक मुळे (४०, रा. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली), संदीप बसेशंकर (२५), दिलीप बसेशंकर (२६) दोघेही रा. वघ व अजय नवले (२३, रा. कारधा) यांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
चालक दारू प्यायलेला
ही मंडळी दारोडा येथून निघाल्यानंतर काही वेळ सिर्सी (ता. उमरेड) येथे थांबले होते. तिथे या वऱ्हाड्यांनी बंद पडलेल्या ट्रकला धक्काही दिला. बोलेरो व ट्रकचालक एकमेकांच्या परिचयाचे होते. बोलेरोचालक ट्रकचालकासोबत बोलेरोच्या केबिनमध्ये दारू प्यायला आणि पुढच्या प्रवासाला निघाला. या अपघातात तोही जखमी झाला. मात्र, अपघात होताच त्याने लगेच घटनास्थळाहून पळ काढला. तो पोलिसांना अद्यापही गवसला नाही.