भिवापूर तालुक्याने काेराेनाला राेखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:09 AM2021-03-15T04:09:38+5:302021-03-15T04:09:38+5:30
शरद मिरे लोकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : तालुक्याने कोरोनाला काही अपवाद वगळता सुरुवातीपासूनच वेशीवर रोखले आहे. काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या ...
शरद मिरे
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : तालुक्याने कोरोनाला काही अपवाद वगळता सुरुवातीपासूनच वेशीवर रोखले आहे. काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यातही तालुक्यात हीच स्थिती आहे. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांची राेज ये-जा सुरू असल्याने त्यांचे अप-डाऊन काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळे त्यांचे अप-डाऊन तात्पुरते बंद करावे, अशी मागणी केली जात आहे.
नागपूर जिल्ह्याच्या टाेकावर असलेला भिवापूर तालुका चंद्रपूर, भंडारा व वर्धा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. त्यामुळे या महानगरातून तालुकास्थळी अप-डाऊन करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. तालुकास्थळी कर्तव्यावर असलेले ९० टक्के अधिकारी व कर्मचारी नागपूर, उमरेड, भंडारा, ब्रह्मपुरी, नागभीड येथून दररोज अप-डाऊन करतात. गतवर्षी जिल्हाभरात सर्वांत शेवटी भिवापूर तालुक्यात कोरोनाने प्रवेश केला. यावेळी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत फारच कमी होती. मात्र, संसर्गजन्य परिस्थितीत शहरवासीयांनी अनेक चांगल्या व्यक्तींना कायमचे गमावले. त्यामुळे शहरवासीयांनी कोरोनाचा धसका घेतला आहे.
अशात शहरवासीयांकडून कोरोना संसर्ग नियंत्रणात्मक नियमावलीचे कमी- अधिक प्रमाणात पालन होत आहे. प्रशासनाने सुद्धा कोरोनाला वेशीवर रोखण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, अप-डाऊनमुळे कोण, कुठून आला, हे कळणे कठीण होते. परिणामी, संसर्ग वाढण्याची शक्यता बळावत आहे. १५ मार्चपासून उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये लॉकडाऊनची नांदी दिल्या गेली आहे. यादरम्यान आरोग्यसेवा वगळता नागपूर शहरात बाहेरील व्यक्तीला प्रवेश मिळणार नाही. त्यानुसार महानगरातील व्यक्तींना सुद्धा ग्रामीण भागात प्रवेश नाकारावा किंवा तपासणीनंतरच प्रवेश द्यावा, असा सूर उमटत आहे.