नागपुरात भोजपुरी अभिनेत्री, मॉडल वेश्याव्यवसाय करताना सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 12:04 AM2021-04-10T00:04:21+5:302021-04-10T00:07:54+5:30
Bhojpuri actress found prostituting गणेशपेठ बसस्थानकाजवळच्या हॉटेल कृष्णामध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) गुरुवारी रात्री छापा घालून वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका भोजपुरी अभिनेत्रीसह तिघींना रंगेहात पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गणेशपेठ बसस्थानकाजवळच्या हॉटेल कृष्णामध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) गुरुवारी रात्री छापा घालून वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका भोजपुरी अभिनेत्रीसह तिघींना रंगेहात पकडले. हे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका दलालाला अटक करण्यात आली असून दुसरा मात्र पळून गेला.
हॉटेल कृष्णामध्ये हायप्रोफाईल अभिनेत्री आणि मॉडेलकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एसएसबीला गुरुवारी मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसबीचे पोलीस निरीक्षक रवी नागोसे यांनी कारवाईसाठी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे हे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दीपेश ऊर्फ गगन दिलीपभाई कानाबारा याच्याशी संपर्क करण्यात आला. १८ हजारात अभिनेत्री आणि मॉडेल देण्याचे ठरले. ग्राहकांना कृष्णा हॉटेलमध्ये बोलविण्यात आले. त्यानुसार, गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास ग्राहक हॉटेलमध्ये गेले. काही वेळेनंतर एसएसबीच्या पथकाने तेथे छापा मारला. यावेळी ३२, २५ आणि २३ वयोगटातील तीन वारांगना पोलिसांना रंगेहात सापडल्या. या तिघीही कोलकाता (पश्चिम बंगाल) मधील रहिवासी असून त्यातील एक भोजपुरी चित्रपटाची अभिनेत्री असून, तिने ॲटम साँगसह काही वेबसिरिजमध्येही काम केल्याचे समजते. दोघी वेगवेगळ्या इव्हेन्टमध्ये काम करतात.
दीपेश ऊर्फ गगन कानाबारा (वय ३६, रा. सतनामीनगर) आणि रेहान नामक दलालाने त्यांना काही दिवसांपूर्वी नागपुरात वेश्याव्यवसायासाठी कॉन्ट्रॅक्टवर बोलवून घेतले होते. दीपेशने त्यांना एका भाड्याच्या खोलीत ठेवले होते. ग्राहक मिळताच तो त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी देहविक्रयासाठी पाठवित होता. वेळेनुसार, पैसेे दिले जात होते. एका ग्राहकाचे ८ ते १० हजार रुपये दीपेश आणि रेहान घेत होते तर वारांगनेला त्यातील अडीच ते तीन हजार रुपये दिले जायचे. पोलिसांनी छापा घातल्याचे लक्षात येताच रेहान तेथून बेमालूमपणे सटकला.तर, दीपेशला पोलिसांनी अटक केली. वारांगनांकडून १२ हजार रुपये, तीन मोबाईल तसेच आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे वेश्याव्यवसाय
लॉकडाऊनमुळे सर्व कामधंदे बंद झाले. मात्र, हायप्रोफाईल जगणे, चमक दमक, जैसे थेच असल्याने झटपट पैसे मिळविण्यासाठी वेश्याव्यवसायात गुंतल्याची माहिती पकडल्या गेलेल्या महिलांनी पोलिसांना दिली. छाप्यानंतर तब्बल १४ तास पोलिसांची कारवाई चालली. गणेशपेठ ठाण्यात या प्रकरणी आरोपी दीपेश आणि रेहानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रवी नागोसे, उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, मंगला हरडे, अनिल अंबादे, राशिद शेख, भूषण झाडे, अजय पाैनिकर आणि मनीष रामटेके यांनी ही कारवाई केली.